ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि ठाणे जिल्ह्यात covid-19 च्या रुग्णांची वाढती संख्या पाहून आज केंद्रीय आरोग्य पथकाने ठाणे महानगरपालिकेतील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांची आढावा बैठक घेऊन ठाणे जिल्ह्यात कशाप्रकारे उपाययोजना केल्या गेल्या आहेत याची माहिती घेतली. या पथकाचे प्रमुख होते केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल. तसेच राज्यातील आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास देखील या पथकासोबत उपस्थित होते.
या पथकातील सदस्यांनी महानगरपालिकांना मृत्यूदर कमी करण्याला जास्तीत जास्त प्राधान्य द्या, अशा सूचना दिल्या. तसेच जास्तीत जास्त चाचण्या करा जेणेकरुन रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करता येतील अशाही सूचना दिल्या. वाढती रुग्णसंख्या पाहून घाबरुन न जाता लोकांना वेळेत उपचार घेण्यासाठी उपाय योजना आणि त्याची अंमलबजावणी करा, असेही केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील महानगरपालिकांच्या आयुक्तांना सांगितले.
कोविड रुग्णालयाला भेट
सुरुवातीस केंद्रीय पथकाने मुंब्रा येथील अमृतनगर, इन्शानगर येथील प्रतिबंधित लोकांची पाहणी करुन तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाला भेट देवून डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बाळकूम साकेत येथील 1000 बेडचे ठाणे कोविड रुग्णालयाची पाहणी करुन सोयी-सुविधांचा आढावा घेतला. दिल्लीवरुन आलेले हे पथक विमानतळावरुन थेट मुंब्रा येथे दाखल झाले. ठाणे शहरातील पाहणी करुन मग त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी ठाणे पोलिसांसह आयुक्त डॉ. मेखला, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी, मीरा भायंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. राठोड, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त दयानिधी असे सर्व अधिकारी उपस्थित होते.
मृत्युदर कमी करण्यावर भर देण्याच्या सूचना
सद्यस्थितीत कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी त्यामुळे घाबरुन न जाता त्याचे योग्य व्यवस्थापन करून मृत्युदर कमी करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी या आढावा बैठकीत दिल्या. त्याचप्रमाणे चाचण्यांची क्षमता वाढवावी जेणेकरुन बाधित लोकांना वेळेवर उपचार देता येतील. त्याचप्रमाणे कोविडची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांशी समन्वय साधून त्यांना मदत करा, असेही यावेळी लव अग्रवाल यांनी सांगितले. सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेत रुग्णांची संख्या लवकरच आठ हजारांपर्यंत पोहोचेल. तर ठाणे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या तीस हजारांचा टप्पा पार करेल. तर एकूण मृतांचा आकडा देखील 900 च्या पुढे पोहचला आहे. त्यामुळे मुंबईनंतर सर्वात बिकट परिस्थिती ठाणे जिल्ह्यात निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.
Ajit Pawar PC | काहीही झालं तरी राज्याला या संकटातून बाहेर काढायचं : अजित पवार