दोन तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
एबीपी माझा वेब टीम | 27 Mar 2018 04:47 PM (IST)
यानंतर रेल्वे वाहतूक थांबवून तातडीने दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. हे काम चार वाजता पूर्ण झालं.
अंबरनाथ : तब्बल दोन तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वाढत्या उष्णतेमुळे रेल्वे रुळाला तडा गेल्याचं कळतं. आज दुपारी दोनच्या सुमारास अंबरनाथ- बदलापूरदरम्यान मोरीवली रेल्वे फटकाजवळ रुळाला तडा गेल्याचं निदर्शनास आलं. यानंतर रेल्वे वाहतूक थांबवून तातडीने दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. हे काम चार वाजता पूर्ण झालं. या दरम्यान मुंबईहून हैदराबादला जाणारी हुसैनसागर एक्स्प्रेस, मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस, मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्यांसह कर्जत दिशेला जाणाऱ्या सात लोकल रखडल्या होत्या. दुपारच्या वेळी लोकलला गर्दी नसली, तरी ऐन पिक अवरच्या तोंडावर रेल्वेच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.