Central Railway Update : मध्य रेल्वेवर पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकलच्या 80 हून अधिक फेऱ्या वाढणार आहे. मात्र या सर्व फेऱ्या एसी लोकलच्या असणार आहेत. नवीन वेळापत्रक भरून काढण्यासाठी एसी लोकल चालवल्या जाणार आहेत.  मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. दरम्यान ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर धावत असलेल्या एसी लोकल बंद करुन, त्या सर्व एसी लोकल मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावर चालवण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत ही महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरील सर्व लोकल या एसी लोकल करण्याचा विचार सुरु आहे. दरम्यान, गेल्या रविवारी मध्य रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण करण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून ते मध्यरात्री दोनपर्यंत ब्लॉक जाहीर करण्यात आला होता. या ब्लॉकसाठी लोकलच्या 160 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या होत्या.  


मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. गेल्या रविवारी मध्य रेल्वेवर सकाळी 8 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला. त्याआधी मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या पाहणी आणि मंजुरीनंतर हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या मार्गिकेचे काम जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. 


गेल्या दहा वर्षांपासून ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी अनेकदा मुदत वाढवून देण्यात आली आहे. पण तरिसुद्धा तांत्रिक अडचणी, भूसंपादन यांसारख्या कारणांमुळे अंतिम मुदत पुढे ढकलण्यात आली. आता या मार्गिकांच्या कामाला अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरु आहे. यापूर्वीही या मार्गिकांच्या कामासाठी मोठा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सप्टेंबर 2021 मध्ये मार्गिकेच्या कामासाठी दहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. यामध्ये सध्याचे रूळ थोडे बाजूला घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या नवीन रुळांसाठी जागा उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेसह अन्य तांत्रिक कामंही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. 


भविष्यात प्रवाशांना फायदा
 
गेल्या रविवारी घेण्यात आलेल्या जम्बो मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. मात्र यामुळे भविष्यात प्रवाशांना फायदा होणार आहे. पाचवी सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान पारसिकच्या बोगद्यातून दिवा मार्गे पुढे जातील. तर ठाण्याहून सुटणाऱ्या जलद लोकल पारसिकच्या बोगद्यातून न जाता नवीन बनवलेल्या मार्गांवरून धावू लागतील. एक्सप्रेस आणि लोकलचे मार्ग वेगवेगळे झाल्यामुळे वेळापत्रकात अधिक लोकल सामावता येतील. याचा फायदा ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत, कसारा अशा ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांना होईल. -
 
ठाणे ते दिवा या दरम्यान होणारे काम हे कुर्ला ते कल्याण या पाचव्या आणि सहाव्या मालिकेच्या प्रकल्पाचा पहिल्या टप्प्याचे काम आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यांचे काम हाती घेण्यात येईल. एमआरव्हीसी बांधत असलेल्या पाचवी सहावी मार्गिका खऱ्या अर्थाने त्याच वेळी उपयोगी पडेल ज्यावेळी सीएसएमटी ते कल्याण यादरम्यानचे काम पूर्ण होईल. कुर्ला ते कल्याण या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी जर तेरा वर्षे लागली असतील तर कुर्ला ते सायन आणि सायन ते सीएसएमटी या दोन टप्प्याचे काम पूर्ण होण्यास किती वेळ लागेल याचा अंदाज आज कोणीच बांधू शकत नाही.


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह'