मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) रविवार (8 ऑक्टोबर) रोजी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार नाही. सध्या मध्य रेल्वेकडून वाडीबंदर यार्ड आणि पनवेल रीमॉडेलिंग नाईट ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेकडून दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी घेण्यात येणार ब्लॉक हा रद्द करण्यात आलाय. सध्या हार्बर मार्गावर सुरु असलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे. पण रविवारी देखील ब्लॉक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना थोडाफार दिलासा मिळणार असल्याचं म्हटलं जातयं. 


मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा म्हणजेच  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण सेक्शन मेन लाईन, तसेच मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल आणि  ट्रान्स-हार्बर म्हणजे ठाणे ते पनवेल या मार्गांवर मेगाब्लॉक नसेल. त्यामुळे या रविवारीदेखील गाड्या वेळापत्रकानुसार धावतील. सध्या मध्य रेल्वेवर ब्लॉकची मालिकाच सुरु आहे. याचा फटका प्रवाशांना बसत असल्याचं पाहायला मिळतयं. 


मध्य रेल्वेवर नव्या ब्लॉकची घोषणा


 मुंबई हार्बर मार्गावर 30 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 11 वाजल्यापासून 2 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी एक वाजेपर्यंत 38 तासांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला होता. हा ब्लॉक संपतो न संपतो तर हार्बर मार्गावर पुन्हा एका नव्या ब्लॉकची घोषणा करण्यात आलीये. स्टॅब्लिंग लाईनच्या कामासाठी 5 ऑक्टोबरपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत पनवेल स्टेशन जवळ आणखीन एका रात्रकालीन मेगाब्लॉकची घोषणा मध्य रेल्वे केली आहे. दरम्यान याआधी रात्रकालीन मेगाब्लॉक आणि यार्ड रीमॉडेलिंग कामामुळे पनवेल जवळ स्पीड रिस्ट्रिक्षन देखील ठेवण्यात आले आहे. त्यामुळे  ट्रान्स हार्बरसह हार्बर मार्गावरील लोकल दिवसभर 30 मिनिटे उशिराने धावत आहेत.


मध्य रेल्वेवर ब्लॉकची मालिका सुरुच


मध्य रेल्वेच्या प्रवाशांची साडेसाती संपायचे नाव घेत नाही. गेल्या आठवड्यापासून विविध मोठ्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या पनवेल स्थानकात मेगाब्लॉक घेण्यात आला. मात्र पायाभूत सुविधांच्या या विकास कामांमुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. याची सुरुवात 38 तासांच्या जम्बो मेगाब्लॉकने झाली . सुरुवातीला 38 तासांचा सांगितलेला हा जम्बो मेगाब्लॉक नंतर पाच तासांनी वाढवण्यात आला.


त्यामुळे हार्बर मार्गावर पनवेल ते बेलापूर दरम्यान तब्बल तीन दिवस एकही लोकल धावली नाही. त्याच दुर्दैव म्हणजे त्याच पनवेल स्टेशन जवळ मालगाडी घसरली आणि एक्सप्रेस गाड्यांना देखील त्याचा फटका बसला. सुरुवातीला छोटे वाटणारे हे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे मुंबईहून आणि उत्तर भारतातून कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांच्या प्रवाशांना 15 ते 20 तास ट्रेनमध्येच रखडत बसावे लागले. 


हेही वाचा : 


Central Railway : मध्ये रेल्वेकडून ब्लॉकची मालिका सुरुच, वाडीबंदर आणि पनवेलजवळ असणार नवा ब्लॉक