मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळानं लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या दंडाची रक्कम 20 वर्षांपूर्वी वाढवण्यात आली होती. 2004 मध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आली होती. आता मध्य रेल्वेकडून दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
मध्य रेल्वेनं आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 115 कोटी रुपये वसूल केले होते. मध्य रेल्वेनं 20 लाख 56 हजार विनातिकीट प्रवाशांकडून ही रक्कम वसूल केली आहे. तर, पश्चिम रेल्वेनं 46 कोटी रुपये वसूल केले आहेत. 9 लाख 62 हजार प्रवाशांकडून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक बी. अरुण कुमार यांनी मुख्य व्यवस्थापक वाणिज्यिक व्यवस्थापक (प्रवासी सेवा) यांना रेल्वे बोर्डाकडे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याताबत पत्र पाठवलं आहे.
2004 मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंडाची रक्कम 50 रुपयांवरुन 250 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आलेली नाही. नव्यानं सुरु करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, एसी लोकल याचा विचार करता दंडाची रक्कम वाढवावी,असा मध्य रेल्वेचा प्रस्ताव आहे. महागाईचा विचार करता दंडाची रक्कम वाढवावी, असा प्रस्ताव आहे. मुंबईतील लोकलचा विचार केला असता रात्रीच्यावेळी एसी लोकल मध्ये रात्रीच्यावेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते.
टीसींवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ
लोकलमध्ये प्रवास करताना देखील प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी करण्याचे अधिकार टीसींना देण्यात आलेले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून टीसींवरील हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. पश्चिम रेल्वेत तैनात असलेल्या 29 वर्षीय तिकीट तपासणीसाला एका प्रवाशाने हॉकी स्टिकने मारहाण केल्याची घटना घडली आहे. विजयकुमार पंडित असं 29 वर्षीय तिकीट तपासणीसाचं नाव आहे.
गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8.53 वाजता नालासोपारा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एक प्रवाशी फर्स्ट क्लासच्या डब्यातून उतरला, टीसीने त्याचं तिकीट तपासल्यावर त्याची तिकीट सेकंड क्लासच्या डब्याचं असल्याचं निदर्शनास आलं. टीसीने त्या प्रवाशाला दंड मारला. मात्र एक तासाने पुन्हा तो प्रवासी नालासोपारा रेल्वे स्थानकावर आला आणि त्यानं हॉकी स्टिकने मारहाण केली.
इतर बातम्या :