मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत 8 ऑक्टोबरला होणार आहे.  मुंबई मंडळाच्या लाॉटरीत ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना  कोकण मंडळाकडून काढण्यात येणाऱ्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.  महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी 7 हजार घरांसाठी सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून त्यासंदर्भातील नियोजन सुरु असल्याची माहिती आहे. कोकण मंडळाला विकासांकडून 20 टक्क्यातील 1419 घरं मिळण्याची शक्यता आहे.


कोकण मंडळाची जाहिरात कधी येणार?


म्हाडाच्या कोकण मंडळाकडून राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.  कोकण मंडळ ऑक्टोबर महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणांवरील विकासकांकडून दिली जाणारी 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील आणि 15 टक्के एकात्मिक योजनेतील एकूण 1419 घरं उपलब्ध होणार आहेत.


म्हाडाच्या कोकण मंडळाकडे ठाणे, कल्याण डोंबिवली आणि वसई विरार महापालिका क्षेत्रातील घरांसाठीचे प्रस्ताव विकासकांकडून देण्यात आल्याची माहिती आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ज्या घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे ती घरं अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील असल्याची माहिती आहे. या घरांची किंमत 20 ते 30 लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.


म्हाडाच्या घरांची सोडत कधी?


म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2030 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे त्या घरांसाठी 1लाख 13 हजार अर्ज सादर झाले होते. त्या अर्जांची सोडत 8 ऑक्टोबरला काढली जाणार आहे. या सोडतीकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 8 ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. म्हाडानं अर्ज सादर करण्यास 4 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, सुरुवातीच्या काळात म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर म्हाडाकडून विकासकांकडून मिळालेल्या 370 घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयासह म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढ देण्यात आलेल्या कालावधीत म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीला मुंबईकरांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. म्हाडाच्या घरांसाठी 1 लाखांहून अधिक अर्ज सादर करण्यात आले आहेत.  


इतर बातम्या :


Mhada Lottery 2024 : म्हाडाचा मुदतवाढीचा निर्णय गेमचेंजर ठरला, मुंबईतील घरांसाठी लाखांहून अधिक अर्ज, जाणून घ्या आकडेवारी