मुंबई, पुणे आणि नाशिक, महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक समृद्धीचा त्रिकोण. या तीन शहरात नोकरी आणि इतर कामांसाठी रोज प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मात्र सध्या मुंबई पासून नाशिक आणि पुण्यासाठी अनेक एक्स्प्रेस गाड्या सकाळी-संध्याकाळी सुटतात. त्यात डेक्कन क्वीन, पंचवटी, प्रगती, राज्यराणी, सिंहगडसारख्या एक्स्प्रेस आहेत ज्या तुडुंब भरलेल्या असतात. मात्र आता या शहरांना जोडण्यासाठी लोकल ट्रेनचा पर्यायाचा गांभीर्याने विचार सुरु आहे. मध्य रेल्वेचे निवृत्त चीफ लोको इन्स्पेक्टर वामन सांगळे यांनी याबाबत मागणी करुन पाठपुरावा केला होता.
मात्र खंडाळा आणि कसारा घाट म्हणजे सोपी गोष्ट नाही. दोन्ही घाट अतिशय कठीण आहेत. इथे एक्स्प्रेससाठीही बँकर इंजिनाची गरज घ्यावी लागते. त्यामुळे लोकलमध्ये काही बदल करण्याच्या सूचना आरडीएसओने केल्या आहेत.
याबाबत पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे बोर्ड आणि आरडीएसओनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तशा सूचना त्यांनी मध्य रेल्वेला दिल्या आहेत आणि मध्य रेल्वेने आवश्यक बदल करुन नवीन लोकल बनवण्यासाठी आयसीएफला पत्रही लिहिलं आहे.
या जानेवारी महिन्यात ही लोकल येऊन चाचण्या सुरु होतील. त्या यशस्वी झाल्या तरंच हे सर्व शक्य आहे. मग मुंबई ते थेट पुणे आणि नाशिक प्रवास करत येईल तेही लोकलने. यामुळे एक्स्प्रेस गाड्यांमधील गर्दी कमी होईल, विशिष्ट वेळेत गाडी पकडण्याची धडपड कमी होईल, वेळ कमी लागेल आणि पैसेही कमी लागतील. सोबत अनेक लहान मोठे उद्योगधंदे वाढण्यास मदत होईल.