मुंबई : अनंत चतुदर्शीच्या (Anant Chaturdashi) दिवशी मुंबईतील गणपती (Ganeshostav) पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून (Central Railway) 10 उपनगरीय विशेष लोकल (Special Local) चालवल्या जाणार आहेत. मध्यरात्रीच्या वेळेस मध्य रेल्वेकडून या विशेष लोकलची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरुन कल्याण/ठाणे/बेलापूर स्थानकादरम्यान या विशेष लोकल चालवल्या जातील. तसेच या विशेष लोकलचे वेळापत्रक देखील मध्य रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशभक्तांकची प्रवासाची चिंता मिटलीये.
दरम्यान अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठा जनसागर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईनगरीमध्ये येत असतो. गर्दीमुळे गाडीने प्रवास करणं शक्य होत नाही. अशा वेळी लोकल हा एक उत्तम पर्याय लांबून येणाऱ्या प्रवाशांसाठी असतो. ही गोष्ट मध्य रेल्वेच्या निदर्शनास आली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर या विशेष लोकल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आलाय. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेष लोकलचं हे वेळापत्रक कसं असणार हे सविस्तर जाणून घेऊया.
सीएसएमटी ते कल्याण, ठाणे दरम्यान 'या' वेळेस धावणार लोकल
छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरुन कल्याण, ठाण्याच्या दिशेने डाऊन मार्गावर मध्यरात्री 1 नंतर या विशेष लोकल धावणार आहेत. सीएसएमटीवरुन कल्याणच्या दिशेने डाऊन मार्गावर मध्यरात्री 01.40 वाजता विशेष लोकल सुटेल. ही लोकल कल्याण स्थानकावर पहाटे 3.10 वाजता पोहोचेल. सीएसएमटीवरुन ठाण्याच्या दिशेने जाणारी विशेष लोकल मध्यरात्री 02.30 वाजता सुटेल आणि पहाटे 03.30 वाजता ठाण्याला पोहचेल. सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेने आणखी एक विशेष लोकल चालवली जाणार आहे. पहाटे 03.25 वाजता ही लोकल सीएसएमटीवरुन स्थानकावरुन सुटेल आणि पहाटे 4.55 वाजता कल्याणला पोहोचेल.
कल्याण स्थानकावरुन मध्यरात्री 00.05 वाजता ही विशेष लोकल सुटेल आणि मध्यरात्री 01.30 वाजता सीएसएमटीला पोहचेल. तर ठाणे स्थानकावरुन मध्यरात्री 01.00 वाजता ही विशेष लोकल सुटेल आणि सीएसएमटीला 02.00 वाजता पोहोचेल. तर मध्यरात्री 02.00 वाजता दुसरी विशेष लोकल चालवली जाईल जी पहाटे 03.00 वाजता सीएसएमटीला पोहचेल.
हार्बर लाईलनवरही चालवली जाणार विशेष लोकल
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सध्या रात्रकालीन मेगाब्लॉक सुरु आहे. पंरतु तरीही अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. सीएसएमटीहून बेलापूरच्या दिशेने विशेष लोकल ही मध्यरात्री 01.30 वाजता सुटेल आणि बेलापूरला 02.35 वाजता पोहोचेल.तर दुसरी लोकल ही सीएसएमटीहून 02.45 वाजता सुटेल आणि बेलापूरला 03.50 वाजता पोहोचेल. तसेच बेलापूरहून सीएसएमटीच्या दिशेने मध्यरात्री 01.15 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला 02.20 वाजता पोहोचेल.तर दुसरी लोकल ही मध्यरात्री 02.00 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला पहाटे 03.05 वाजता पोहोचेल.