मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिवसात दुसऱ्यांदा अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे रुळाला तडे गेल्याने कळवा आणि मुंब्रा या मार्गावरील मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यानच्या सर्व स्लो डाऊन लोकल फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान वाहतूक कधीपर्यंत सुरळीत होईल, याबाबत अद्याप कसलीही माहिती मिळू शकली नाही.
स्लो ट्रॅकवरील गाड्या फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आल्याने डोंबिवली, कल्याण, ठाणे येथील प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र कळवा, मुंब्रा या ठिकाणी फास्ट गाड्या थांबत नसल्याने येथील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ऐन गर्दीच्या वेळीच रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सकाळी देखील याच मार्गावर रुळाला तडे गेल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.