Central Railway Jumbo Mega Block : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील फलाट क्रमांक 10 आणि11 च्या रुंदीकरणासह ठाणे (Thane) येथील फलाटांच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेकडून (Central Railway) मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉक कालावधीमध्ये 930 लोकल फेऱ्यांसह 72 मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे रेल्वेचं वेळापत्रक बदलल्यानं याचा थेट परिणाम नोकरदार वर्गावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर रेल्वेनं प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं आणि गरज असल्यास रेल्वेनं प्रवास करावा, असं आवाहन केलं होतं.
कल्याण डोंबिवली परिसरातून दर दिवस लाखो प्रवासी, चाकरमानी मुंबईच्या दिशेनं प्रवास करतात. मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता होती. मात्र, रेल्वेच्या आवाहनाला प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं आहे. प्रवाशांनी देखील आज रेल्वे प्रवास टाळल्याचं दिसून येत आहे. आज कल्याणसह डोंबिवली रेल्वे स्थानकावर देखील नेहमीपेक्षा कमी गर्दी असल्याचं पाहायला मिळालं आहे.
ठाणे स्थानकात स्थानकात 62 तासांच्या मेगाब्लॉकला मध्यरात्रीपासूनच सुरूवात झालीय. मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट मार्गावर 62 तासांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या स्लो मार्गावर 12 तासांचा हा मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर यामुळे वेळापत्रक कोलमडलंय. गाड्यात 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत. आज कामाचा दिवस असल्याने ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल सुरू झालेत. कल्याण डोंबिवली ठाणे या प्लॅटफॉर्मवर गर्दी आहे. सकाळची कामाची वेळ, उकाडा आणि गाड्या उशिरा यामुळे प्रवासी हैराण झालेत. आज मध्य आणि हार्बर मार्गावरील 161 लोकल रद्द आहेत, सध्या ठाणे स्थानकात 20 मिनिटांनी एक अशी मुंबईकडे जाणारी लोकल येत आहे. एकच ठिकाणी फास्ट आणि स्लो लोकल येत असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ आहे, दुपारनंतर जेव्हा ठाणे स्थानकात मुंबईकडे जाणारा स्लो ट्रॅक सुरू होईल तेव्हा यात फरक पडेल.
मध्य रेल्वेनं जम्बो मेगाब्लॉक का घेतला?
सीएसएमटीच्या फलाटांच्या रूंदीकरणाचं काम पूर्ण झालं असून ही लाईन कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं हा ब्लॉक घेतलाय. या रूंदिकरणामुळे आता इथं 16 ऐवजी 24 डब्यांच्या लांब पल्याच्या गाड्या थांबवता येतील. इंटरलॉकिंग, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर या गोष्टी सुरू करण्याकरता आज रात्रीपासून हा ब्लॉक सुरू होईल. त्याकरता शुक्रवारी मध्यरात्रीनंतर रविवार दुपारपर्यंत सीएसएमटीची मध्य रेल्वे ही भायखळा रेल्वे स्थानकापर्यंतच तर हार्बर मार्गिका ही वडाळ्यापर्यंतच अप आणि डाऊन सुरू राहिल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :