मुंबई : प्रवाशांकडून दंड म्हणून आकारण्यात आलेल्या रकमेचा नवीन विक्रम झाला आहे. एप्रिल 2019 ते डिसेंबर 2019 या कालावधीत प्रवाशांकडून दंड म्हणून आकारण्यात आलेली रक्कम तब्बल 155 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ज्यात अंदाजे 30 लाख प्रवासी तिकीट न काढता प्रवास करत असल्याने त्यांना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे. परिणामी मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 155 कोटी रुपये कमावले आहेत.


यात मुंबई उपनगरीय लोकलच्या प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे. मध्य रेल्वेचे एकूण 5 विभाग आहेत. अश्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर, सोलापूर या विभागात मिळून ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षीच्या याच काळात करण्यात आलेल्या कारवाईच्यापेक्षा 10% अधिक रक्कम यावेळी केलेल्या कारवाईत जमा झाली आहे. फक्त डिसेंबर 2019 या एका महिन्यात 12 कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत प्रवाश्यांना आवाहन करुन तिकीट काढून प्रवास करण्यास सांगितले आहे. मात्र, रेल्वेने यासंदर्भात अधिकाधिक जनजागृती करुन तिकीट नसलेल्या प्रवाश्यांना दंड आकारायला हवा, तरच रेल्वेमधील अश्या प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. सोबत जे प्रवासी तिकीट काढून प्रवास करतात त्यांना जास्त सोयी सुविधांचा लाभ घेता येईल.

फुकट्या प्रवाशांमध्ये वाढ -
मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात मात्र, यापैकी अनेकजण तिकिट न काढताच प्रवास करत असतात. पश्‍चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वेवर अशा फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यात सर्वाधिक फुकटे प्रवासी मध्य रेल्वेवर आहेत. रेल्वेतून प्रवास करताना योग्य तिकीट न घेता तसेच फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वर्षभरात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून ही आकडेवारी समोर आली आहे. बऱ्याचदा प्रवासी गर्दीमुळे किंवा घाईत असल्या कारणाने विनातिकीट प्रवासाचे धाडस करतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. रेल्वेच्या डेटानुसार, देशभरात दररोज 75 हजार प्रवाशी विनातिकीट किंवा चुकीच्या तिकीटावर प्रवास करतात.

संबंधित बातमी - डोंबिवलीच्या लोकल गर्दीचा आणखी एक बळी, लोकलमधून पडून तरूणीचा मृत्यू

Mumbai | पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे | ABP Majha