डोंबिवली : सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्थानक अशी ओळख असलेल्या डोंबिवलीत गर्दीमुळे बळी जाण्याचं सत्र सुरूच आहे. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी (16 डिसेंबर) एका 22 वर्षीय तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. चार्मी पासद असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे.


डोंबिवलीच्या नवनीत नगरमध्ये आई आणि दोन भावांसोबत राहणारी चार्मी ही नुकतीच ग्रॅज्युएट झाली होती आणि घाटकोपरच्या खासगी कंपनीत नोकरीला लागली होती. रोजच्या प्रमाणे आजही तिने डोंबिवली स्थानकातून सकाळी 8.52 ची सीएसटी फास्ट लोकल पकडली, मात्र गर्दीमुळे तिला आत जाताच आलं नाही. अखेर दारात लटकलेल्या चार्मीचा कोपर रेल्वे स्थानकाजवळ तोल गेला आणि ती खाली कोसळली, या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर रेल्वे प्रवासी संघटना आणि विशेषतः महिला रेल्वे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही वारंवार मध्य रेल्वेकडे लोकल वाढवण्याची मागणी करतो, मात्र ती पूर्ण होत नाही. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यावर रेल्वेला जाग येणार? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. तर मृत चार्मीच्या भावाने या संपूर्ण घटनेची जबाबदारी रेल्वेचीच असल्याचा आरोप केला आहे.

ठाण्यापलीकडे आणि विशेषतः कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या परिसरात मुंबईच्या तुलनेत स्वस्त घरं असल्यानं सर्वसामान्य माणूस या भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे. हा वर्ग दररोज मुंबईलाच रोजगारासाठी प्रवास करतो. मात्र प्रवासी संख्येच्या तुलनेत दळणवळणाच्या सुविधा अतिशय अपुऱ्या असल्याची खंत यानंतर व्यक्त होत आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून लोकलची संख्या वाढवावी, यासाठी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत आवाज उठवला होता. मात्र त्यानंतरही फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळं गाढ झोपेत असलेलं रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यानंतर जागं होणार? हाच खरा प्रश्न आहे.