मुंबई : मुंबईत प्रवास करताना टॅक्सी महत्त्वाची भूमिका निभावते. प्रवाशांना टॅक्सीला हात करुन टॅक्सी थांबवावी लागते. अनेकदा टॅक्सी रिकामी नसेल तरी लोक हात दाखवत टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर कधी टॅक्सी रिकामी असेल तरी टॅक्सी चालक आपल्याला घेऊन जाण्यास तयार होत नाही तर कधी रिकामी टॅक्सी न थांबता सुसाट निघून जाते. त्यामुळे प्रवाशांचे टॅक्सी चालकांशी नेहमीच वाद होतात. मात्र आता मुंबईत प्रवाशांच्या सोयीसाठी टॅक्सींवर तीन रंगाचे दिवे लागणार आहेत. त्यामुळे टॅक्सी आपल्यासाठी उपलब्ध आहे की नाही याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली आहे.


मुंबईत टॅक्सी चालक आणि प्रवासी यांच्यामधील वादाचे अनेक किस्से समोर आले आहेत. अनेकदा टोकाचे वाद होतात. असे वाद टाळण्यासाठी टॅक्सींवर लाल, हिरवा, सफेद असे तीन रंगाचे दिवे लावण्यात येणार आहेत. यामध्ये हिरव्या रंगाचा दिवा टॅक्सी प्रवाशांसाठी उपलब्ध असल्याची निशाणी असणार आहे. लाल रंगाच्या दिव्यामुळे टॅक्सीमध्ये आधीच प्रवासी आहेत, असं गरजू प्रवाशाला कळणार आहे. तर सफेद दिवा म्हणजे टॅक्सी चालकाला कुठेही जायचं नाही, असा त्याचा अर्थ असणार आहे, अशी माहिती शेखर चन्ने यांनी दिली.


जर टॅक्सीवर हिरवा रंगाचा दिवा सुरु असेल तर टॅक्सी चालकाला भाडं नाकारता येणार नाही. हिरवा दिवा सुरु असेल तरीही टॅक्सी चालकाने भाडं नाकारलं तर प्रवासी याबाबतची तक्रार परिवहन विभागाकडे करु शकतो. टॅक्सी चालक-मालक संघटनांशी आम्ही याबाबत चर्चा करणार आहोत. तीन दिव्यांच्या नव्या कल्पनेमुळे प्रवाशांना आणि टॅक्सी चालकांना फायदाच होईल, असा विश्वास शेखर चन्ने यांनी व्यक्त केला आहे.


टॅक्सीवरील तीन रंगाच्या दिव्यांच्या योजनेची अंमलबजावणी येत्या 1 फेब्रवारीपासून होणार आहे. 1 फेब्रुवारीपासून पुढे रजिस्टर होण्याऱ्या नव्या टॅक्सींसाठी हा नियम लागू असणार आहे. त्यासोबत मुंबईत धावणाऱ्या जुन्या टॅक्सींवर टप्प्याटप्प्याने दिवे लावण्यात येतील, अशी माहिती शेखर चन्ने यांनी दिली आहे. या नव्या योजनेमुळे मुंबईत टॅक्सी आणि प्रवासी यांची रस्त्यावर होणारी भांडणं बंद होतील, अशी आशा आहे.