आज मध्य रेल्वेने आयोजित केलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांना आम्ही, सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल कधी सुरू होईल, असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना गोयल म्हणाले," अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. त्याच प्रकारे सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय हा देखील राज्य सरकार घेईल. राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केल्यास, रेल्वे मंत्रालय केंद्र सरकारशी सल्लामसलत करून आम्हाला तसे आदेश देईल. त्यानंतरच मुंबई लोकल सुरू करण्यात येईल. मात्र असे असले तरी राज्य सरकारने कधीही मागणी केल्यास त्वरित लोकल सुरू करण्याची आमची पूर्ण तयारी आहे". लोकल सुरू झाल्यास सोशल डिस्टंसिंग कसे राखता येईल, याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आता ज्याप्रमाणे स्टेशनवर प्रवाशांनी कुठे उभे राहायचे यासाठी मार्किंग करण्यात आली आहे, त्याच प्रकारे सर्व स्टेशनवर मार्किंग करून प्रवाशांना उभे राहण्यास आवाहन करण्यात येईल, तसेच प्रसारमाध्यमांच्या मदतीने लोकलमध्ये देखील सोशल डिस्टंसिंग ठेवण्यास आम्ही आवाहन करू.
पावसाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्व सदस्य, अधिकाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक
सध्या सुरू असलेली क्यूआर कोडची सिस्टीम अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे, लोकलमध्ये देखील येणाऱ्या काळात अशी सिस्टीम राबवण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे. मात्र त्याआधी लांब पल्ल्याच्या काही गाड्यांमध्ये क्यूआर कोड सिस्टीम लावून प्रवाशांना सोडण्याचा पायलट प्रोजेक्ट आम्ही सुरू करू. तो यशस्वी झाल्यास सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आणि नंतर मुंबई लोकल मध्ये देखील हा प्रोजेक्ट राबविण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबत लोकल सुरू झाल्यानंतर विशिष्ट वेळेत होणारी गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करावा अशी मागणी रेल्वेने केली असून, त्याबाबत राज्य सरकार देखील विचार करत आहे.
एप्रिल महिन्यापासून covid-19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वेच्या डब्यांचे रूपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये केले होते. मध्य रेल्वेने देखील आपल्या सव्वाशे डब्यांचे रूपांतर करून त्यांना सुसज्ज ठेवले आहे. मात्र अजून पर्यंत राज्य सरकारने त्यांची मागणी न केल्याने त्यापैकी एकाही डब्याचा उपयोग होऊ शकला नाही असे गोयल म्हणाले.
Mumbai Local | राज्य सरकारनं हिरवा कंदील दिल्यास मुंबईत लोकल धावणार, शलभ गोयल यांची माहिती