मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकलमधली गर्दी हा कायमच प्रवाशांसाठी डोकेदुखीचा विषय असतो. दिवा स्थानकावर जलद लोकल आतापर्यंत थांबत नव्हत्या, मात्र रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे दिवावासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. दररोज 10 फास्ट लोकल दिवा स्थानकावरही थांबणार आहेत.

 
दिवा स्थानकात दोन नवीन प्लॅटफॉर्म बांधण्याचं काम येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर नोव्हेंबरपासून कल्याण आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या जलद लोकल दिवा स्टेशनवर थांबतील. रोज धावणाऱ्या 84 फास्ट लोकलपैकी 10 लोकल्सना दिव्याला थांबा मिळेल.

 
दिव्याला थांबणाऱ्या लोकलची संख्या आणि प्रवाशांचं प्रमाण यात तफावत असल्यामुळे काही महिन्यांपूर्वी दिवा स्थानकात रेलरोको करण्यात आला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे स्लो लोकलवरील ताण कमी होईल आणि प्रवाशांना लागणारा वेळही वाचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.