मुंबई :  ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा द्यावा, असा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला.  अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत इम्पिरीकल डेटा केंद्राने देण्याचा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.  


हा ठराव मांडतेवेळी भुजबळ म्हणाले की,  समता परिषद माध्यमातून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो होतो. 2017 ला केस झाली.  फडणवीस सरकारच्या काळात 2019 पर्यंत काही केलं नाही. 31 जुलै 2019 ला तुम्ही अध्यादेश काढला. सुप्रीम कोर्टानुसार हा अध्यादेश नव्हता.   दुसऱ्या दिवशी 1 ऑगस्ट 2019 ला नीती आयोगला पत्र लिहिलं इम्पेरिकल डाटा मागितला. अध्यादेश परिपूर्ण असता तर तुम्ही माहिती मागितली नसती, असं भुजबळ म्हणाले. 


Maharashtra Assembly Session 2021 : तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरणी भाजपचे 12 आमदार निलंबित


विरोधकांवर निशाणा साधत भुजबळ म्हणाले की, एवढी वर्ष तुम्ही जनगणना का नाही केली. सात वर्षे झालं तुमचं सरकार आहे. सरकार चुका सांगत आहे मग दुरुस्ती का केली नाही.  तुम्ही पाच वर्षात काय केलं तुम्ही प्रयत्न केला का? कोर्टाला सांगितलं का? असा सवाल त्यांनी केला. 


तुमचे प्रयत्न कमी पडतात म्हणून आम्ही हाऊसला सांगत आहोत, पंतप्रधानांना सांगत आहोत. आरक्षणाला तुम्ही विरोध करता, मुस्लिम आरक्षण तुम्ही विरोध करतात. 2021 पासून भारत सरकार जनगणना सुरू झाली नाही कारण कोरोना आला. मग आम्ही कसं करणार. जे तयार आहे तो डाटा आम्हाला द्या, असं भुजबळ म्हणाले. 


MPSC : 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा


फडणवीसांवर निशाणा साधत भुजबळ म्हणाले की,  फडणवीस साहेब म्हणाले सत्ता आली तीन महिन्यात आरक्षण देतो. मी म्हणतो आरक्षण महत्वाचं की सत्ता महत्वाची.  तुम्ही मागा, तुम्हीच श्रेय घ्या. तुम्ही शब्दच्छल करत आहात. चुका झाल्या तर दुरुस्त करायला पाहिजे होतं, आता सांगता तपासत आहोत. मग सहा सात वर्षे काय केलं? असा सवाल त्यांनी केला. 


ते म्हणाले की,  हा निर्णय सगळ्या देशाला लागू झाला आहे.  भाजप शासित राज्यात हा प्रश्न निर्माण होणार आहे.  फडणवीस साहेब आमच्याबरोबर चला. आता एकत्रित पंतप्रधानांना विनंती करू. डेटा आम्हाला द्या.  तुमचा हेतू शुद्ध तर आमचा हेतूही शुद्ध आहे. 15 महिन्यात आम्ही काय केलं म्हणता? भारत सरकारने तर 2021 पासून अजूनही जनगणना केली नाही. कोरोनाचं कारण देत आहात. आणि आम्हाला सर्व्हे करायला सांगता. आम्ही कसे करणार? असा सवाल त्यांनी केला. ओबीसींचं प्रेम आहे तर सत्तेचं काय घेऊन बसलात. सत्ता नसली तरी तुम्ही आलं पाहिजे. मुख्यमंत्री जाऊन आले. तुम्हीही जायला हवं. चला, श्रेय तुम्ही घ्या, आम्ही तुमच्यासोबत येत आहोत, असं आव्हान भुजबळांनी दिलं.