मुंबई : कोरोना चाचणी अहवालास होणाऱ्या विलंबामुळे निदानापूर्वीच होणारे मृत्यू आणि दररोज वाढणारा मृतांचा आकडा यामुळे भिवंडी शहर हादरले आहे. वाढत्या मृत्यूंमुळे कब्रस्तानांतील जागा अपुरी पडत असून कबर खोदण्यासाठी कामगार मिळणेही दुरापास्त झाले आहे. करोना उद्रेकापूर्वी दररोज केवळ एक ते दोन मृतदेहांना दफन करणारे कर्मचारी सध्या दिवसाकाठी 15 ते 20 मृतदेहांसाठी कबरी खोदत आहेत. दररोज कबरी खोदून काही कब्रस्तानातील कामगार आजारी पडले आहेत, तर काहींनी संसर्गाच्या भीतीने काम सोडले आहे. परिणामी, मृतांना दफन करण्यासाठी जागा आणि कबरी खोदण्यासाठी कामगार शोधताना यंत्रणा हतबल झाली आहे. तर शहरात कोरोना ,सारी व इतर आजाराने एप्रिल महिन्यापासून 15 जून पर्यंत 561 जणांचा मृत्यू झाला असून शहरातील अनेक कब्रस्थान फूल झाल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.


कोरोना फैलावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात भिवंडीत आठ दिवस एकही रुग्ण आढळला नव्हता. मुंब्रा, मालेगावसारख्या मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये रुग्णांचा आकडा वाढत असताना भिवंडीत रुग्ण नाहीत असे म्हणत स्थानिक यंत्रणा पाठ थोपटून घेत होत्या. परंतु अचानक हा आकडा का वाढत आहे? यामागील कारण आता पुढे येऊ लागले आहे.


12 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या भिवंडी शहरात अजूनही पाहिजे तशा कोरोना चाचण्या झालेल्या नाहीत. या चाचण्यांचा अहवाल येण्यास 3 ते 4 दिवस लागत आहेत. अहवाल येईपर्यंत अनेक रुग्णांना उपचारांपूर्वीच प्राणास मुकावे लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. कोरोना मृतांचा आकडा खूप मोठा असण्याची भीतीही व्यक्त होत आहे.


भिवंडी शहरात 18 कब्रस्ताने आहेत. मृत्यू वाढत असल्यामुळे कामाचा ताण सध्या प्रचंड असल्याने भिवंडीच्या कब्रस्तानातील कर्मचारी कंटाळून पळ काढत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत मृतांचे नातेवाईक स्वतः कबर खोदून दफनविधी पार पाडत आहेत असे स्थानिकांनी व कबर खोदणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.


भीतीने कामगारांचा पळ


दोन महिन्यांपूर्वी कबर खोदण्यासाठी दिवसा दोन आणि रात्री दोन असे चार कामगार होते. आता एक कामगार मिळणे कठीण झाले आहे. काहींनी संसर्गाच्या भीतीने काम सोडले आहे, तर काही आजारी पडले आहेत.


शहरातील गैबी पीर कब्रस्तान , रेहमतपूर कब्रस्तान, पाच पीर कब्रस्तान , बडा कब्रस्तान , कोटर गेट कब्रस्तान , आएसबीबी कब्रस्तान येथे मागील वर्षाच्या सरासरीत जून महिन्यात अधिक मृतदेह दफन करण्यात आल्याचे उघड झाले असून शहरातील अनेक कब्रस्तान फुल झाली आहेत . नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देऊन त्यांना वेळीच ऑक्सीजनचा पुरवठा मिळवून देण्यासोबत शहरातील खाजगी रुग्णालय ताब्यात घेऊन गरीब नागरिकांवर महानगरपालिकेने उपचार करण्याची गरज असल्याच चर्चा स्थानकांमध्ये रंगत आहे.


Mumbai Corona Update | केईएम रुग्णालयाच्या कॅन्टिनमधील 21 कर्मचाऱ्यांना कोरोना