मुंबई : जेडे हत्याकांड प्रकरणी पत्रकार जिग्ना व्होरा आणि पॉलन्स जोसेफ यांच्या दोषमुक्तीला सीबीआयकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह इतरजण याप्रकरणात दोषी आहेत.
न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सीबीआयतर्फे विशेष सराकरी वकील प्रदीप घरत यांनी अपीलांची माहीती कोर्टाला दिली. मुंबईतील विशेष मोक्का कोर्टाने याआधी जिग्ना व्होरा आणि पॉलन्स जोसेफ या दोघांची निर्दोष मुक्तता केली होती.
काय आहे प्रकरण?
11 जून 2011 रोजी एका इंग्रजी दैनिकाचे जेष्ठ पत्रकार जोतिर्मय डे यांची पवई येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या छोटा राजनच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार जिग्ना वोरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरूण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी, पॉलसन जोसेफ व दिपक सिसोडीया यांना अटक करण्यात आलं. त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
छोटा राजन विरोधात महाराष्ट्रात एकूण 70 गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये जे. डे यांच्या हत्येचाही समावेश होता. राजनचा ताबा सीबीआयकडे असल्याने हे प्रकरणही तपासासाठी सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आलं असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. विशेष मोक्का न्यायाधीश एस. एस. अडकर यांच्यासमोर हा खटला चालवण्यात आला. या खटल्याचा अंतिम निकाल सुनावताना पुराव्यांअभावी कोर्टानं जिग्ना व्होरा आणि पॉल्सन जोसेफ यांना दोषमुक्त केलं होतं.
महत्त्वाचे म्हणजे या हत्येचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या यादीत साक्षीदार असलेला रवि राम हा सीबीआयच्या आरोपपत्रात आरोपी दाखवण्यात आला आहे. रामने राजनच्या सांगण्यावरून पॉल्सनमार्फत 20 परदेशी सिमकार्ड मारेकऱ्यांना पुरवल्याचा सीबीआयचा आरोप आहे. तसेच जे. डे यांची माहिती राजनला दिल्याचा आरोप असलेली पत्रकार जिग्ना वोरा व राजन यांच्यात झालेले संभाषणही सीबीआयच्या आरोपपत्रात आहे. फॉरेंसिक लॅबने या दोघांच्या आवाजाचे नमूने तपासले असून संभाषणातील आवाज त्यांचाच असल्याचा अहवाल दिला आहे. आरोपपत्रात राजनसह इतर आरोपींवर हत्या, हत्येचा कट, शस्त्र प्रतिबंधक कायदा व मोक्का अंतर्गत आरोप ठेवण्यात आला होते.
जेडे हत्याकांड प्रकरण : पत्रकार जिग्ना व्होरा आणि पॉलन्स जोसेफ यांच्या दोषमुक्तीला हायकोर्टात आव्हान
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
18 Mar 2019 01:30 PM (IST)
छोटा राजन विरोधात महाराष्ट्रात एकूण 70 गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये जे. डे यांच्या हत्येचाही समावेश होता. राजनचा ताबा सीबीआयकडे असल्याने हे प्रकरणही तपासासाठी सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आलं असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -