मुंबई : बीकेसी येथे रात्रीच्यावेळी एका गुजरातच्या व्यापाऱ्याला वाचवण्यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेता प्रवीण दरेकर पोहचले होते. ते जाणीवपूर्वक त्या व्यापाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. माझं स्पष्ट मत आहे की, या प्रकरणात मोठं गौडबंगाल आहे. त्यामुळे याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांनी एसआयटी नेमावी; अशी मागणी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक आठवड्यापूर्वी पत्र लिहून केली होती. यासाठी मी स्वतः जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती. परंतु एक आठवडा उलटून देखील अद्याप काहीच झालं नाही.", असं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलं आहे. मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप विविध प्रश्नांसंबंधी पत्रकारांशी बोलत होते. 


"माझा सरकारला सवाल आहे की, सचिन वाझे या गुन्हेगाऱ्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होतो, मग मी पत्र देऊन देखील देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि उपस्थित आमदार यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही? अशा शब्दांत भाई जगताप यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. यासोबतच अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील विमानाने 10 हजार रेमडेसिवीर घेऊन येतात आणि वाटतात. हा काय प्रकार आहे?", असा सवालही काँग्रेस नेते भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. 


"माझा सवाल केंद्र सरकारला आहे की, इथं महाराष्ट्र सरकारला इंजेक्शन मिळत नाहीत मग भाजपचे हे खासदार हा साठा आणतात कुठून? माझी राज्य सरकरला विनंती आहे की, याप्रकरणी सुजय विखे पाटील यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करावा.", असंही ते म्हणाले. 


दरम्यान, माजी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यावर बोलताना भाई जगताप यांनी हे तर होणारच होतं. आशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. आणखी गुन्हे आगामी काळात दाखल होतील असं देखील जगताप म्हणाले.


कोविड परिस्थिती बाबत बोलताना भाई जगताप म्हणाले की, "1 मेला लसीकारण सुरु होईल असं वाटतं नाही. सध्या मुंबईतील प्रमुख लसीकरण केंद्र बंद आहेत. कारण केंद्राकडून आवश्यक साठा आलेला नाही. 35 हजार कोटींची तरतूद केंद्राने केली आहे. मग आपण कमी कुठं पडत आहोत? देशाचे पंतप्रधान याबाबत बोलणार आहेत का? केंद्रानं जाहीर केलेलं 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज कुठं गेलं? राज्याला मोफत लसी उपलब्ध होत नाही असं का होतंय? त्यांनी लस मोफत उपलब्ध करून द्यावी. राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोर्टानं कडक लॉकडाऊन करावं." असं ते म्हणाले.


"राज्य सरकारने देखील राज्यात 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवलं आहे. आमचा याला पाठिंबा असेल. आज राज्याने दीड कोटी नागरिकांचं लसीकरण केलं आहे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. मुंबईतील 138 लसीकरण केंद्र आहेत, माझी विनंती आहे की, मुंबईत 227 वॉर्ड आहेत. यामध्ये प्रत्येक वॉर्डात किमान 2 सेंटर तयार करावे. केंद्राने सध्या व्यापाऱ्यासारखी भूमिका घेतली आहे. मोदींना विनंती आहे, तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे तो करा. परंतु मृतांच्या शरीराचा तुम्ही व्यवसाय करू नका. देशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण गरजेचं आहे. त्यामुळे मोदींनी तत्काळ लस सर्व राज्यांना उपलब्ध करून द्यावी.", असंही भाई जगताप म्हणाले.