मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप समर्थकांमध्ये व्यंगचित्र वॉर पाहायला मिळालं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.


राज ठाकरेंनी 'स्वतंत्रते न बघवते' असं शीर्षक या व्यंगचित्राला दिलं होतं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघे लाल किल्ल्यावर लोकशाहीला फासावर लटकवत असल्याचं व्यंगचित्रातून दाखवण्यात आलं. राज ठाकरेंच्या या व्यंगचित्रानं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं.





मात्र त्यानंतर संतापलेल्या भाजप समर्थकांनीही राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला व्यंगचित्राने उत्तर दिलं. राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला एडिट करत 'अच्छे दिन न बघवते' असं शीर्षक देत भाजप समर्थकांनी एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं. या व्यंगचित्रात थेट राज ठाकरेंनाच फासावर लटकवण्यात आलं आलं आहे आणि नरेंद्र मोदी-अमित शाह दोरी ओढताना दिसत आहेत.


गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे व्यंगचित्रांच्या माध्यमातून सातत्याने भाजप आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे आता भाजप समर्थकांनीही राज ठाकरेंना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.