मुंबई : मुंबई सेंट्रलमधील एका सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटी अर्थात प्रबंध समितीवरुन दोन पदाधिकाऱ्यांना पायउतार व्हावं लागलं आहे. दोनपेक्षा जास्त मुलं असूनही पदावर असल्याने या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. 'मुंबई मिरर' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदींनुसार दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या सदनिकाधारकांना सोसायटीच्या निवडणुका लढवण्याची संमती नाही. बऱ्याचशा सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना या नियमाची माहिती नाही, किंवा माहिती असूनही ते सर्रास पायदळी तुडवले जातात.

सहकारी सहाय्यक निबंधकांनी मुंबई सेंट्रलमधील हाऊसिंग सोसायटीतल्या मॅनेजिंग कमिटीवर असणाऱ्या दोघांना पदावरुन बाद केलं. विशेष म्हणजे तक्रारकर्त्याने दोन मुलं असण्याच्या मुद्द्यावरुन दोघांवर ठपका ठेवलाच नव्हता.

न्यू ग्रीन चेंबर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील हसन अली मुकादम नावाच्या सदनिकाधारकाने दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. सोसायटीचे संयुक्त खजिनदार समीर शाह आणि कमिटी मेंबर इम्रान खान यांनी सदस्यांच्या परवानगीविना रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरु केल्याची तक्रार केली होती.

तक्रारीला उत्तर देताना सहाय्यक निबंधक कुमार चव्हाण (ई वॉर्ड) यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील फारसा माहित नसलेली तरतूद समोर आणली. दोनपेक्षा जास्त असेलील व्यक्ती निवडणुकीला उभे राहू शकत नाहीत, किंवा त्यांचं नामांकन केलं जाऊ शकत नाही किंवा त्यांची नियुक्ती केली जाऊ शकत नाही.

त्यानंतर शाह आणि खान यांना गेल्या वर्षी 23 नोव्हेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र त्यांनी हजेरी न लावल्यामुळे किंवा कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना पदावरुन मुक्त करण्यात आलं.