पालघर : ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याने पालघर जिल्हा परिषदेच्या 15 आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमधील 14 जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त झालेल्या जागांवर सध्या निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस रंगतदार बनत चालला आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असून डहाणूतील वणई गटातील लढतीवर सर्वांचेच विशेष लक्ष आहे. 


पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी वणई गटातून आपल्या मुलाला उमेदवारी दिल्याने गावित यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी सध्या साम-दाम-दंड-भेद वापरून प्रचाराला सुरुवात केली असली तरी त्यांचे चिरंजीव रोहित गावित या गटातून निवडून आल्यास पुढे रोहित गावित विधानसभेवर दावा करतील अशी भीती पालघर विधानसभा क्षेत्रातील अनेक स्थानिक आदिवासी तरुणांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे राजकारणात सक्रिय होऊ पाहत असलेल्या आणि भविष्यात कधीतरी आमदारकी मिळेल असं स्वप्न पाहणाऱ्या अनेक स्थानिक आदिवासी तरुणांचं हे स्वप्न रोहित गावित यांच्यामुळे धुळीस मिळण्याची शक्यता आहे.


भाजप एकाकी लढत देत असून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी वेगवेगळी मोट बांधल्याने जिल्ह्यामध्ये चुरशीची निवडणूक पाहायला मिळणार आहे. यामध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी भाजपा आणि मनसे एकत्र आले असून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना कडवी टक्कर देण्यास सज्ज झाले आहेत. 


यामध्ये डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गट प्रतिष्ठेचा ठरत असून पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेने येथील मागील निवडणुकीत विजयी झालेले सुशील चुरी या कार्यतत्पर असलेल्या उमेदवाराला डावलून खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांना उमेदवारी दिल्याने या गटामध्ये प्रचारासाठी राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते हजेरी लावत आहेत. 


शिवसेनेकडून रोहित गावित, भाजपाकडून पंकज कोरे, मनसेकडून हितेश पाटील, राष्ट्रवादीकडून विराज गडग, तर काँग्रेसकडून वर्षा वायेडा या मतदारसंघात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या गटावर सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिलं असून मतदारांनाही मोठा प्रश्न पडला आहे. परंतु स्वपक्षीय कार्यकर्त्यांसह विरोधकांनीही गावित यांच्या चिरंजीवाला हरवण्यासाठी गुप्त बैठकांसह इतरही उपाय सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे खासदार गावित यांच्या अस्तित्वाची लढाई सध्या सुरू असल्याचे चित्र आहे.


खासदार राजेंद्र गावित हे मूळचे नंदूरबारचे असून सध्या त्यांचे वास्तव्य मिररोड येथे असते तर त्यांच्या चिरंजीवाला वणई गटाची उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांचा आत्तापर्यंत कोणताही जनसंपर्क मतदारांशी नव्हता. त्यामुळे या मतदार संघातील मतदारांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ज्यांच्या जवळ साम दाम दंड ही पद्धती असते अशानाच तिकिटांची लॉटरी दिली जाते अशी भावना आता सामान्य मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे ही निवडणूक तोंडावर असताना ह्या भागातील गावांमध्ये मटण व दारू पार्ट्या जोरात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दारू आणि पार्टीचं आमिष देऊन मतदारांना भुलविलं जातंय हेही समोर येत आहे. त्यामुळे खासदार गावित यांनी आपल्या मुलासाठी वशील्यावर उमेदवारी मिळवली असली तरी खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याची खूणगाठ त्यांनी बांधली असली तरीही मतदारराजा रोहित गावित यांच्या पारड्या किती मत टाकतो हे आपल्याला  येत्या 6 ऑक्टोबरलाच पाहायला मिळेल. तर वणई गटामध्ये एकमेव महिला उमेदवार असून याच गटातील वर्षा भरत वायेडा यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर बहुजन विकास आघाडीकडून सारस जाधव रिंगणात आहेत


पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असताना देखील गावीत यांनी जिल्हा परिषद गटाकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याच पाहायला मिळतंय. मात्र असे असताना देखील शिवसेनेकडून पुन्हा गावित यांच्या चिरंजीवांना संधी दिल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोषाच वातावरण निर्माण झालं आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या रद्द झालेल्या 15 आणि जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या 14 जागांसाठी ही निवडणूक पार पडत असून भाजप, शिवसेना,  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी प्रमुख लढत या जागांवर पाहायला मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे त्यातच काँग्रेसची या जिल्ह्यात पिछेहाट असली तरी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारार्थ सर्व जिल्हा पिंजून काढलाय. मरगळ आलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना नवं संजीवनी देण्याचा प्रयत्न यावेळी नाना पटोले यांनी केला. मात्र बोटावर मोजण्याइतकेच काँग्रेसकडे सध्या जिल्ह्यात कार्यकर्ते उरले असल्याने काँग्रेसला या पोटनिवडणुकीत किती यश येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.