चिमुकल्या आराध्याच्या मदतीसाठी नेटसॅव्हींचं कॅम्पेन, हृदयदानाचं आवाहन
एबीपी माझा वेब टीम | 09 Apr 2017 01:17 PM (IST)
मुंबई : मुंबईतील 4 वर्षांच्या आराध्यासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कॅम्पेन चालवलं जात आहे. #SaveAaradhya या हॅशटॅगखाली आराध्यासाठी हृदय दान देण्याचं आवाहन नेटसॅव्हींकडून सुरु करण्यात आलं आहे. 8 एप्रिलला संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळात हे कॅम्पेन चालवण्यात आलं. मात्र त्यानंतरही सोशल मीडियावर आराध्याला मदतीचं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत राहणाऱ्या आराध्या मुळे या 4 वर्षीय मुलीला हृदयविकाराचा त्रास आहे. तिला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. यावेळी तिच्या मदतीला नेटकरी धावून आलेत. फेसबुक ट्विटर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आराध्यासाठी मदतीचं आवाहन केलं जात आहे. तसंच या कॅम्पेनद्वारे अवयवदानासाठी नोंदणीही केली जात आहे. कॅम्पेन सुरु झाल्यावर काही वेळातच हजारोंच्या संख्येत सोशल मीडियावर नेटसॅव्हींनी पोस्ट करत आराध्याला मदतीचा हात दिला आहे. अनेकांनी फेसबुकवर लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून आराध्याला मदतीचं आवाहन केलं आहे. आराध्याला डायलेटेड कार्डिओमायोपाथी हा दुर्धर प्रकारचा हृदयविकार झाला आहे. आराध्याला सध्या एका हृदयाची आवश्यकता आहे. आराध्यासाठी O+, O-, A+, A- या रक्तगटाचा दाताच हृदयदान करु शकतो. हृदयदान केवळ ब्रेन डेड व्यक्तीच करु शकते. आराध्यासाठी 10 ते 15 वयोगटातील व्यक्तीच्या हृदयाची गरज आहे, तसंच त्याचं वजन 40 किलोपेक्षा कमी असणं गरजेचं आहे.