मुंबई : मुंबईतील उपनगरिय रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.


मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर ठाकुर्ली स्टेशनवर सुरु असलेल्या बांधकामामुळे विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9.20 ते संध्याकाळी 5.20 पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मेगाब्लॉकदरम्यान काही लोकल्स रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही या मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकावरुन सकाळी 10.08 ते संध्याकाळी 5.28 या दरम्यान सुटणाऱ्या स्लो आणि सेमीफास्ट लोकल दिवा आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट रेल्वेमार्गावर चालवल्या जातील. या सर्व लोकल्स दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील. या लोकल कोपर आणि ठाकुर्ली स्थांनकांवर थांबणार नाहीत.

सीएसटी-डोंबिवली लोकल स्लो लाईनवर चालवल्या जातील.

सीएसटी-कल्याण लोकल सेवा पूर्णपणे बंद राहिल.

सीएसटी-डोंबिवलीदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वे

पश्चिम उपनगरिय रेल्वे मार्गावर आज 1000 वा विशेष जंबो मेगाब्लॉक घेण्यात येईल. 1995 साली बोरीवली ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन फास्ट रेल्वेमार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

आज रविवारी मरिन लाईन्स ते माहिम जंक्शन दरम्यान विशेष जंबो मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉकदरम्यान सर्व डाऊन स्लो लोकल फास्ट मार्गावरुन धावतील.

मेगाब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.