मुंबई : रिझर्व्ह बँक लवकरच दहा रुपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असलेली महात्मा गांधी सीरिजमधील ही नोट असेल. दहा रुपयांच्या नव्या नोटेवर कोणार्कमधील सूर्यमंदिराचं चित्र असेल.


तपकिरी रंगाच्या नव्या दहा रुपयांच्या नोटेवर आपल्या भारतीय संस्कृतीची छाप असेल. या नोटेची छपाई सध्या रिझर्व्ह बँकेकडून सुरु करण्यात आली असून लवकरच ती चलनात येणार आहे. आरबीआयने नव्या नोटेचा फोटो जारी केला आहे.

गेल्याच आठवड्यात या नोटेचं डिझाईन निश्चित झालं होतं. त्यानंतर आता तिची छपाईही सुरु झाली आहे. यापूर्वी 2005 मध्ये दहाच्या नोटेत बदल करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास 13 वर्षांनी पुन्हा या नोटेची रचना बदलण्यात येत आहे.

आरबीआयने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महात्मा गांधी सीरिजमधील 200 आणि 50 रुपयांची नोट जारी केली होती. त्यानंतर आता नवी दहाची नोट येणार आहे. 


कशी असेल दहा रुपयांची नवी नोट?

  • नोटेवर अंकी इंग्रजी आणि देवनागरी लिपीत 10 लिहिलेलं असेल.

  • नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचं चित्र असेल.

  • नोटेवर 'RBI', ‘भारत', ‘INDIA' आणि '10' सूक्ष्म अक्षरात लिहिलेलं असेल.

  • नोटेवर उजव्या बाजूला अशोकस्तंभाचं चित्र असेल.

  • नोटेच्या मागे डाव्या बाजूला प्रिंटिंगचं वर्षं लिहिलेलं असेल.

  • नोटेवर स्वच्छ भारतचा नाराही लिहिलेला असेल.