उदाहरणच द्यायचं झालं तर 1999 सालचं घेऊ. त्याकाळी राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. तेव्हा छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं. नियमानुसार 601 क्रमांकाचं दालन मुख्यमंत्री तर 602 क्रमांकाचं दालन उपमुख्यमंत्री यांना देण्याचा प्रघात आहे. त्यानुसार छगन भुजबळ यांनी त्या दालनाचा स्वीकार केला. कालांतराने भुजबळांवर तेलगी घोटाळ्याचा आरोप झाला आणि त्यांना मंत्रिपद सोडाव लागलं. त्यानंतर हेच दालन राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाले. अजितदादांनी याच दालनातून कारभार पाहिला. पण, सिंचन घोटाळ्यामुळे त्यांच्यावर आरोप झाले. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
2014 मध्ये आघाडी सरकारला खाली खेचून भाजप सरकार सत्तेत आलं. त्यावेळी 602 दालन हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मिळालं. एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल विभागासह अनेक खात्यांचा पदभार होता. परंतु, एमआयडीसी जमीन घोटाळ्यासह इतर आरोप झाले. त्यामुळे खडसे यांना पायउतार व्हावं लागलं होतं. खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर 602 दालन हे भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांना देण्यात आलं होतं. फुंडकर हे तत्कालीन कृषीमंत्री होते. दुर्दैवाने फुंडकर यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्यांच्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांआधी 602 दालन हे अनिल बोंडे यांना देण्यात आलं होतं. पण, विधानसभा निवडणुकीत अनिल बोंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा - मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत नाराजी, रामदास कदम शिवसेना नेते पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा
गमंत म्हणजे, 602 दालन हे मंत्रालयातील सर्वात मोठे दालन आहे. त्यामुळे या दालनात फडणवीस यांच्या काळात तीन विभाग करण्यात आले होते. यात अर्जुन खोतकर आणि सदाभाऊ खोत यांची दालनंही थाटण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर पराभूत झाले आणि फडणवीस सरकार नसल्यामुळे खोत यांनाही हे दालन सोडावे लागलं आहे. त्यामुळे 602 दालन हे ज्या मंत्र्यांना मिळाले त्यांच्या पदरी आरोप आणि अपयशच पडले आहे. गंमत म्हणजे अजितदादा आता उपमुख्यमंत्री झाले आहेत. नियमानुसार हे दालन अजितदादांनी स्वीकारणे अपेक्षित आहे. त्यामुळे आगामी काळात अजित दादा हे दालन स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.
Sanjay Raut | भावाला मंत्रिपद न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याची चर्चा | ABP Majha