मुंबई : मुंबईतील भायखळा जेलमधील विषबाधा झालेल्या कैद्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून काही कैद्यांना तब्येत सुधारेपर्यंत रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी नाश्त्यानंतर भायखळा जेलमधील कैद्यांची तब्येत बिघडली होती.


शुक्रवारी जेलमधील 87 कैद्यांना जेवणातून विषबाधा झाली होती. विषबाधा झाल्यानंतर कैद्यांना उलट्या आणि डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला. त्यानंतर या सर्व कैद्यांवर जे.जे रुग्णालयत उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी यापैकी 79 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 8 कैद्यांवर उपचार सुरु आहेत.


उपचार सुरु असलेल्या महिला कैद्यांपैकी तीन महिला 22 ते 24 आठवड्याच्या गरोदर आहेत. या महिलांना 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यातील एका महिलेला अॅनिमिया असल्याने तिचीही खास काळजी घेतली जात आहे.


भायखळा जेलमध्ये जाऊन महिला आयोग जेवण आणि पाणी एफडीएकडे तपासणीसाठी गेलेलं आहे. एफडीएचा रिपोर्ट आल्यानंतर महिला आयोग कारवाई करणार आहे.


काय आहे प्रकरण?
भायखळा जेलमधील कैद्यांनी शुक्रवारी सकाळी नाश्त्यानंतर पोटदुखी, उलट्या होण्याच्या तक्रारी जेल प्रशासनाकडे केल्या. हळूहळू कैद्यांच्या तक्रारीत वाढ झाल्याने जेल प्रशासनाने तात्काळ या कैद्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळ कैद्याना नाश्त्यातून विषबाधा झाल्याचं निष्पन्न झालं.


सूत्रांच्या माहितीनुसार एका महिला कैद्याला कॉलरा झाला होता. त्यावेळी सर्व कैद्यांना प्रतिबंधात्मह गोळ्या देण्यात आल्या होत्या. या देण्यात आलेल्या गोळ्या आणि दूषित अन्न या दोन्ही गोष्टींमुळे आजची घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.