मुंबई: “मुंबईच्या स्वच्छतेच्या कंत्राटासाठी आम्ही कधीही अर्ज केला नाही. आम्हाला द्या, आम्ही सहा महिन्यात तो भाग चकाचक करुन दाखवतो”, असं आव्हान साताऱ्याच्या उद्योजकाने दिलं. भारत विकास ग्रुपचे प्रमुख हणमंत गायकवाड यांनी हा विश्वास व्यक्त केला.

रहिमतपूर ते लंडन व्हाया पुणे, अशी जगभर सेवा क्षेत्रात ख्याती पसरलेल्या हणमंत गायकवाड यांनी आपला पॉझिटिव्ह प्रवास ‘माझा कट्टा’वर सांगितला.

नोकरी ते व्यवसाय

हणमंत गायकवाड यांचंही लहानपण तुमच्या-आमच्याप्रमाणे सर्वसामान्य कुटुंबातच गेलं. साताऱ्यातील रहिमतपूर इथं जन्मलेले हणमंत गायकवाड हे शाळेत हुशार होते. त्यांनी इलेक्ट्रानिक इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं.

यादरम्यान त्यांनी आंबे विकण्यापासून ते शेतातील सडं वेचण्यापर्यंत अनेक कामं केली. मात्र तो संघर्ष वाटला नाही, ती मजा होती असं ते सांगतात.

इलेक्ट्रानिक इंजिनिअर झाल्यानंतर ते पुण्यातील टेल्को कंपनीत रुजू झाले. त्यावेळी टाटांची एक कार बाजारात आली, मात्र तिला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, तीचं उत्पादन थांबवलं. त्यावेळी हणमंत गायकवाड यांना त्या कारच्या साहित्य स्क्रॅप करण्यास सांगितलं.

मात्र त्याकाळी सुमारे 8 कोटींचं साहित्य स्क्रॅप करण्याऐवजी त्यांनी तेच साहित्य दुसऱ्या कारला असेंबल करण्याचं ठरवलं. त्यांनी ते करुन दाखवलं. हणमंत गायकवाड यांच्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक टाटा प्रशासनाला आली. त्यावेळच्या वरिष्ठांनी गायकवाडांना बोलावून, तुला काय हवं सांग, असं विचारलं. मात्र त्यावेळी त्यांनी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे माझ्या ओळखीतील, साताऱ्यातील काही मुलांना नोकरी देण्याची विनंती केली.

यादरम्यान त्यांनी ‘भारत विकास ग्रुप’ या संस्थेची स्थापना केली होती. त्यावेळी टाटा प्रशासनाने त्यांच्याच दुसऱ्या कंपनीसाठी ‘हाऊस किपिंग’साठी मुलं पुरवण्यास सांगितलं. इथूनच हणमंत गायकवाडांमधील उद्योजक जन्माला आला. हणमंत गायकावांडांनी सुरुवातीला ‘भारत विकास ग्रुप’ या संस्थेमार्फत 8 मुलं हाऊस किपिंगसाठी कंपनीला पुरवली.  त्यानंतर मागणी वाढत गेली आणि ‘भारत विकास ग्रुप’चा व्याप विस्तारात गेला.

8 मुलांपासून सुरु झालेल्या या संस्थेने विस्तार घेतल्यानंतर, हणमंत गायकवाड यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि हाऊस किपिंगचाच उद्योग उभा करण्याचं ठरवलं. त्यांनी सुरुवातीला बंगळुरुतील एका कंपनीचं कंत्राट घेतलं. तिथे उत्तम काम केल्यानंतर कंपनीला काम मिळत गेली.  सध्या ‘भारत विकास ग्रुप’ अर्थात BVG ही कंपनी राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, सुप्रीम कोर्ट, तिरुपती, अक्षरधाम, शिर्डी संस्थान अशा देशभरातील बहुतेक महत्त्वाच्या संस्थासाठी हाऊस किपिंगची सेवा पुरवतात. एकट्या दिल्लीत भारत विकास ग्रुपचे तब्बल 9 हजार कर्मचारी आहेत. त्यावरुन त्यांच्या कंपनीचा व्याप लक्षात येऊ शकतो.

आरोग्य सेवा

हाऊस किपिंगशिवाय BVG ने विविध क्षेत्रात व्यवसाय वाढवला. यामध्ये आरोग्य आणि कृषी क्षेत्राचा विशेष उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्रात अॅम्ब्युलन्स पुरवण्याचं काम हणमंत गायकवाड यांच्याच ग्रुपकडे आहे. 108 क्रमांकावर संपर्क साधल्यास मोफत अॅम्ब्युलन्स पोहोचवली जाते. राज्यभरात अॅम्ब्युलन्सचं जाळं तंत्रज्ञानाने जोडून, गरजूंना लाभ पोहोचवला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर सध्या मुंबईत सुरु झालेल्या बाईक अॅम्ब्युलन्सची जबाबदारी हणमंत गायकवाड यांच्याच संस्थेकडे आहे.

दुसरीकडे लंडन आणि अमेरिकेच्या रस्त्यावरही लवकरच ‘भारत विकास ग्रुप’च्या अॅम्ब्युलन्स धावताना दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या देशांसोबत त्यांची करार प्रक्रिया सुरु असून, ते काम अंतिम टप्प्यात आहे.

शेतकऱ्याचं उत्पन्न दुपटीने वाढवण्याचा मानस

हणमंत गायकवाड यांचं काम केवळ हाऊस किपिंग आणि आरोग्य सेवेपुरतंच मर्यादित नाही. त्यांच्या संस्थेने शेती क्षेत्रातही मोठी क्रांती करण्याच्या दिशेने पावलं टाकली आहेत. नवनवे तंत्रज्ञानाचा शेतीला आणि शेतकऱ्याला कसा फायदा होईल, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कसं होईल, याबाबत त्यांची संस्था संशोधन करुन प्रत्यक्ष कार्य करत आहे.

त्यांनी प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपट्ट करुन दाखवलं आहे. इतकंच नाही तर जशी शेती इस्रायलमध्ये केली जाते, त्यापेक्षा उत्तम परिस्थिती आपल्याकडे आहे, त्यामुळे आपण निश्चितच शेतीतून दुप्पट उत्पन्न घेऊ शकतो, असा विश्वास त्यांना आहे. त्यासाठी त्यांच्या संस्थेने बियाणांपासून ते पोषक पण रासायनिक नसलेली कृषी औषधांची निर्मिती केली आहे.

संपर्क 020-27165220

email - info@bvglife.com  

bvgagri@gmail.com