ठाणे: भिवंडीत रिक्षाचालकांनी मारहाण केलेल्या एसटी चालकाचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आज ठाणे डेपोच्या एसटीचालकांनी बंद पुकारला आहे. ठाणे डेपोमधून भिवंडी, बोरीवली, मीरा-भाईंदर, वसईकडे जाणारी वाहतूक बंद आहे. ठाण्यातून खोपटमधील एसटी डेपोही पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.


एसटी बसचालक प्रभाकर गायकवाड बुधवारी रात्री डेपोमध्ये बस नेत असताना गेटजवळ रिक्षा उभी होती. त्यावेळी गायकवाड यांनी चालकाला रिक्षा हटवण्यास सांगितलं. रिक्षाचालकाने त्यांना न जुमानता रिक्षा हलवली नाही. त्यावेळी एसटी आत नेताना रिक्षाला बसचा धक्का लागला.

यानंतर दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली आणि त्याचे पर्यावसन जोरदार हणामारीत झालं. यात रिक्षाचालकांनी एसटी चालक गायकवाड यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी गाडकवाड यांचा मृत्यू झाला.

या घटनेच्या निषेधार्थ काल भिवंडीमध्ये बसचालकांनी संप पुकारला होता. यामुळे कालपासून भिवंडी डेपोमधली एसटी वाहतूक बंद होती. पण आज याचे पडसाद ठाणे डेपोमध्ये ही दिसत आहेत. ठाणे डेपोमधून भिवंडी, बोरीवली, मीरा-भाईंदर, वसईकडे जाणारी वाहतूक बंद आहे. तसेच ठाण्यातून खोपटमधील एसटी डेपोही पूर्णपणे बंद झाली आहे.

मारहाण करणाऱ्या रिक्शाचालकांवर योग्य ती कारवाई होत नाही, तोवर एसटीवाहतूक सुरु होणार नाही, असा इशारा बसचालकांनी दिल्याने बस स्थानकात सर्व बसेस उभ्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

दरम्यान, बसचालकाच्या मृत्यूचे पडसाद नांदेडमध्येही पाहायला मिळाले. नांदेडमधील देगलूर बस डेपोतील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे भिवंडीमधील हे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरु लागलं आहे.

संबंधित बातम्या

रिक्षाचालकांची बेदम मारहाण, भिवंडीत एसटी चालकाचा मृत्यू