नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या परीवहन बसने दोन विद्यार्थ्याना उडवलं. वाशीमधील घटना असून यामध्ये रमेश बोबडे या 15 वर्षांच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर बाबू पवार हा दुसरा विद्यार्थी जखमी झाला आहे.
वाशी पोलिसांनी बसच्या ड्रायव्हरला अटक केली असून, अधिक चौकशी सुरु केली आहे.
वाशीतील महापालिकेच्या या शाळेत नववीच्या वर्गात शिकणारा रमेश बोबडे आणि बाबू पवार या दोघा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षिकेने चार्ट पेपर आणण्यासाठी पाठवले होते. हे दोघे विद्यार्थी सायकलवरुन जात असताना त्यांना या महापालिकेच्या बसने धडक दिली.
या अपघातात रमेश बोबडे या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. शाळा सुरु असताना या दोघा विद्यार्थ्याना शिक्षिकेने शाळेबाहेर का पाठवले, असा प्रश्न उपस्थित करून या दोषी शिक्षिकेवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
या प्रकरणी वाशी पोलिसांनी बस चालाकाविरुद्ध गुन्हा दाखल करून बस चालक दीपक पाटील याला अटक केली आहे.