मुंबई : पेट्रोलपंपावरील मीटरमधील हेराफेरी मुंबईतील एका तरुणीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणली आहे. अमी सेठ असे या धाडसी तरुणीचं नाव आहे. मुंबईतील चारकोप परिसरातील पेट्रोलपंपावरील हेराफेरी अमी सेठने समोर आणली आहे.


अमी सेठने फेसबुक लाईव्ह केलेला हा व्हिडीओ 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर 42 हजारहून अधिक जणांनी व्हिडीओ शेअर केला आहे.


मुंबईतील चारकोप परिसरातील बीपीसीएल कंपनीच्या पेट्रोलपंपवर पेट्रोल चोरीचे प्रकार घडत होते. अमी सेठ या तरुणीने या सर्व प्रकाराचं फेसबुक लाईव्ह केलं. हा सर्व प्रकार घडत असताना, पोलिस तिथे पोहोचले. त्यानंतर पोलिस स्थानकामधूनही तरुणीने फेसबुक लाईव्ह कर प्रकरणाला वाचा फोडली आणि आपल्या धाडसचं दर्शन घडवलं.

पेट्रोल पंपावरील हेराफेरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणल्यानंतर, अमी सेठने पोलिसांना बोलावलं. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्यानंतर अमीने पोलिस ठाण्यातूनच फेसबुक लाईव्ह करत चुकीच्या गोष्टींविरोधातील आपला संताप व्यक्त केला.