मुंबई : मुंबई आयआयटीमध्ये इंटर्नशीप करणारा त्रिवेंद्रमचा तरुण बैलाच्या धडकेत जखमी झाला आहे. हॉस्टेल गेटबाहेर फोनवर बोलताना अक्षय लाथा नावाच्या तरुणाला धावत आलेल्या बैलाने धडक दिली.

अक्षय काल सकाळी दहा वाजताच्या सुमारास आयआयटी हॉस्टेल गेटच्या बाहेर फोनवर बोलत उभा होता. तेवढ्यात दोन बैल धावत त्याच्या दिशेने आले. त्यातील एका बैलाने अक्षयला जोरदार धडक दिली. त्यामुळे अक्षय खाली कोसळला. या धडकेत तो जखमी झाला.

आयआयटी मुंबईतील इतर विद्यार्थी आणि स्टाफने त्वरित त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. अक्षयच्या पोटाला जबर मार लागला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. ही संपूर्ण घटना मुंबई आयआयटी हॉस्टेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सीसीटीव्ही व्हिडिओ



अक्षय लाथा हा मुंबई आयआयटीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे प्राध्यपक एस. व्ही. कुलकर्णी यांच्याकडे काही दिवसांपूर्वी इंटर्नशीप करण्यासाठी आला होता.

मुंबई आयआयटी परिसरात मोठ्या प्रमाणावर प्राणी आढळतात. मात्र अशाप्रकारे एखाद्या प्राण्याने धडक देण्याचा प्रकार यापूर्वी घडला नसल्याचं म्हटलं जातं. या घटनेनंतर आयआयटी मुंबईने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी योग्य त्या उपयोजना करण्याची गरज आहे.