कल्याण : अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात मुक्या जनावरांसोबत अघोरी प्रकार समोर आला आहे. परंपरेच्या नावाखाली आग आणि धगधगत्या निखाऱ्यांवरून गुराढोरांना चालवण्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर प्राणीमित्रांमधून संताप व्यक्त होत आहे.

अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात वर्षभर गुरांना कुठली बाधा किंवा आजार होऊ नये म्हणून ही परंपरा असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. दिवाळीचा सण हा सगळ्यांच्या आयुष्यात आनंद आणि प्रकाश घेऊन येणारा सण म्हणून ओळखला जात असला तरी याच सणात मुक्या प्राण्यांना मात्र चटके, वेदना सोसाव्या लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दिवाळीच्या दिवशी आपल्या गुराढोरांना अंघोळ घालून त्यांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत मिरवणूक काढून त्यांना धगधगते निखारे आणि आगीतून चालवलं जातं. हा प्रकार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर अशा अनेक तालुक्यात करण्यात येतो. अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात हा प्रकार होत असतानाचे काही व्हिडीओ समोर आले असून त्यात जनावरांसोबत काशाप्रकारे हा अघोरी प्रकार केला जातो, हे समोर आलंय.

आपल्या जनावरांना वर्षभर आजार किंवा कुठली बाधा होऊ नये, यासाठी ही परंपरा असल्याचं ग्रामस्थांचं मत असलं तरी यामुळे प्राणीमित्रांमध्ये मात्र संतापाचं वातावरण पसरलं आहे. अशाप्रकारे मुक्या प्राण्यांचा छळ करून आनंद घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी प्राणीप्रेमी करत आहेत.