मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर लावलेल्या निर्बंधांनंतर फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा ध्वनी प्रदूषणाच्या प्रमाणात थोडी घट झाली आहे. पंरतु त्यामध्ये खूप जास्त फरक पडला नसल्याचे आवाज फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.


आवाज फाऊंडेशनने मागील दोन दिवस शहरातील ध्वनी प्रदूषणाचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये मुंबईत 114.1 डेसिबल इतक्या आवाजाची नोंद करण्यात आली. मागील वर्षी मुंबईत 117.8 डेसिबल इतक्या आवाजाची नोंद करण्यात आली होती.

ध्वनी प्रदूषणाच्या अहवालातील आकड्यांवरून असे स्पष्ट होते की, शहरातील ध्वनी प्रदूषण कमी झाले आहे. परंतु ही घट अतिशय कमी आहे. कोर्टाच्या आदेशांनंतर मोठी घट पहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु तसे झालेले नाही.

मुंबईत सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण हे मरीन ड्राईव्ह परिसरात झाल्याची बाब या अहवालात समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांमुळे शिवाय लोकांनी स्वतः घेतलेल्या जबाबदारीने हे प्रदूषणाचे प्रमाण काहिसे कमी झाले आहे.