मुंबई:  ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. अंगावरुन चार चाकी गाडी जाऊनही चिमुकला सुखरुप असल्याचं समोर आलं आहे.


एक महिला तिची कार इमारतीच्या पार्किंगमधून काढत होती. याच ठिकाणी काही मुले फुटबॉल खेळत होती. यातीलच एका मुलाच्या बुटाची लेस सुटली आणि तो या कारच्या बाजूला लेस बांधण्यासाठी बसला. त्याचवेळी महिलेने गाडी चालू केली आणि अक्षरशः ती कार मुलाच्या अंगावरून पलीकडे निघून गेली.

क्षणभर हा मुलगा गाडीखाली चिरडला गेला असावा असे वाटत असताना, गाडी निघून गेल्यावर हा मुलगा सुरक्षितपणे उठून उभा राहिला आणि धावत पुन्हा खेळायला गेला.

हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा सर्व प्रकार 24 तारखेला संध्याकाळी 7 वाजता घडला.

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळाली नसली तरी काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलाचे दैव अतिशय बलवत्तर असल्याचे दिसत आहे. तसेच लहान मुले खेळत असताना पालकांनी तसेच वाहनचालकांनीदेखील दक्षता बाळगणे गरजेचे आहे.