मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाला (कोस्टल रोड) स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोक्यापर्यंत 9.98 किलोमीटर कोस्टल रोड असणार आहे.


पुढील 4 वर्षांत हा कोस्टल रोड पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. प्रकल्पाचं बांधकाम तीन भागांत विभागण्यात आलं असून काम स्वतंत्रपणे एकाच वेळी केलं जाणार आहे. महापालिकेमार्फत होणाऱ्या कामाचे कंत्राट लार्सन अँड टुब्रो, एचसीसी आणि एचडीसी या कंपनींना मिळणार आहे.


आठ हजार कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या या प्रकल्पाचा खर्च विविध करांमुळे तब्बल 12 हजार कोटींवर पोहचला आहे. या प्रकल्पाचा पहिला भाग प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस, दुसरा भाग हा बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या वरळी बाजूपर्यंत,तर तिसरा भाग प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्क असा असणार आहे.

प्रकल्प सल्लागारांनी बनवलेल्या आराखड्यानुसार प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी उद्यान (पॅकेज 4), प्रियदर्शनी उद्यान ते बडोदा पॅलेस (पॅकेज 1), बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक (पॅकेज 2) अशा तीन भागांमध्ये विभागून या कोस्टल रोडचं काम हाती घेण्यात येत आहे. पॅकेज 4 आणि पॅकेज 1 साठी लार्सन अँड टुब्रोला (एल अँड टी) कंपनी पात्र ठरली आहे. तर पॅकेज 2 साठी एचसीसी व एचडीसी ही कंपनी पात्र ठरली आहे.