मुंबई : मोहरमच्या सुट्टीनंतर आज शेअर बाजाराने काळा शुक्रवार पाहिला. आश्वासक सुरुवात झाल्यानंतरही दुपारी दीड वाजताच्या सुमारास बाजार तब्बल 1100 अंशांनी कोसळल्यामुळे अक्षरशः हल्लकल्लोळ उडाला. बाजार कोसळण्याचं नेमकं कारण कोणालाच सांगता येत नव्हतं. पण काही वेळातच बाजार सावरला आणि बंद होता होता 280 पॉईंट्स खाली बंद झाला. निफ्टीची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. निफ्टीत अखेरीस 91 अंशांची घट झाली.

बाजार कोसण्याची जी काही कारणं पुढे येत आहेत, त्यात प्रामुख्याने समावेश होतो तो 'येस बँके'चा. बँकेचे संस्थापक आणि सीईओ राणा कपूर यांना रिझर्व्ह बँकेने त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यास नकार दिला आणि बाजारात घसरणीला सुरुवात झाली. बँकेच्या शेअर्समध्ये जवळपास 32 टक्क्यांनी घट होऊन बँकेची नेटवर्थ तब्बल 25 हजार कोटींनी कमी झाली.

बाजार कोसळल्यावर DHFL म्हणजेच दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडचे शेअर तब्बल 50 टक्क्यांनी कोसळले. अवघ्या काही मिनिटात कंपनीचं तब्बल 11 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. मात्र कंपनीने तातडीने आर्थिक परिस्थितीची माहिती देत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. कंपनीने कोणाचं कर्ज थकवलं नाहीय. डीएचएफएलला एकूण 4 हजार 800 कोटींचं देणं आहे. पण त्याचवेळी कंपनीकडे 25 हजार कोटींची मालमत्ता असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. या स्पष्टीकरणामुळे कंपनीचा शेअर 23 टक्क्यांनी वधारला. तरी अंदाजे आठ हजार कोटींचा फटका या गोंधळात DHFLला बसला.

सन फार्मालाही या गोंधळाचा मोठा फटका बसला. कंपनीच्या शेअरमध्ये 13 टक्क्यांहून अधिक घट झाली. हाऊसिंग फायनान्स कंपन्या आणि बँकांना आजच्या ब्लॅक फ्रायडेचा मोठाच फटका बसला. इंडिया बुल हाऊसिंगलाही आपली नेटवर्थ 30 टक्क्यांनी गमवावी लागली.