मुंबई | ‘लालबागचा राजा’ गणेश मंडळातील पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार आहे. रविवारी गणेश विसर्जनानंतर कारवाई करण्याचे मुंबई पोलिसांनी आदेश दिले आहेत. पोलिसांनी मंगळवारी 18 सप्टेंबरला झालेल्या बाचाबाचीचं सीसीटीव्ही फूटेजही ताब्यात घेतलं आहे. त्याची नीट पडताळणी करुन गणेश विसर्जनानंतर संबंधित मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी मंगळवारी 18 सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस आणि लालबाग राजा मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यामुळे काही काळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

ज्या लालबागच्या राजासमोर सुख-शांती मागण्यासाठी भक्त जातात. तिथेच राडा सुरु झाला होता. कारण अत्यंत किरकोळ होतं. मंगळवार हा गणपतीचा वार आणि तोच मुहूर्त साधून लालबागच्या दरबारात भक्तांची तुडुंब गर्दी झाली. त्याच गर्दीला आवरत असताना पोलिसांचा धक्का मंडळाच्या खजिनदार मंगेश दळवी यांना लागला आणि तिथेच ठिणगी पडली.

यानंतर बाचाबाची सुरु झाली आणि गोंधळ उडाला. कार्यकर्ते पोलिसांवर धावून गेले. यावेळी डीसीपी अविनाश कुमारही उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही बाजूने धक्काबुक्की सुरु झाली आणि एकच संतापाचं वातावरण बाप्पाच्या दरबारात पाहायला मिळालं.

लालबागच्या दरबारात हा असा राडा होण्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही महिला भक्तांना लालबागच्या मंडपात धक्काबुक्की झाल्याचे व्हिडीओ समोर आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा असा प्रकार समोर आल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.