मुंबई : मुंबईतील नामांकित असलेल्या आयआयटीमध्ये (Bombay IIT) पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण मुंबई आयआयटीच्या वसतीगृहामध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी कँटिनमध्ये टेबल राखून ठेवण्यात आले आहेत. कॅन्टीमधील सहा टेबल आता पूर्णपणे शाकाहारी (Vegetarian) असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवलेत. दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव निर्माण होऊ शकतो, असं विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे कँटिनसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाला विद्यार्थी संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे.
मुंबई आयआयटीच्या हॉस्टेलच्या कॅन्टीमध्ये सहा जेवणाचे टेबल हे शाकाहारी जेवण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतील. असा प्रकारचा निर्णय प्रशासनाकडून बुधवारी मेलद्वारे पाठवण्यात आला. आतापर्यंत अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नव्हता. पण या निर्णयामुळे जातीभेदाला प्रोत्साहन दिले जात असल्याचं विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात येत आहे.
प्रशासनाने असा निर्णय का घेतला?
हॉस्टेलच्या कन्टीनमध्ये जेवताना मांसाहारी पदार्थाचा वास काही जणांना सहन होत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. अशा वेळी कँटीनमध्ये शाकाहारी असणाऱ्या लोकांसाठी सहा वेगळे टेबल्स देणं आवश्यक आहे, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान याच आशयाचा मेल आयआयटी प्रशासनानं कँटिनच्या वॉर्डन, मेसचे सदस्य, मेस कौन्सिलर यांना पाठवला आहे.
विद्यार्थ्यांकडून प्रतीकात्मक आंदोलन
आयआयटी हॉस्टेलच्या कँटिनमध्ये शाकाहारी टेबल राखीव ठेवण्याच्या निर्णयाला आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जे शाकाहारी टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत, त्या टेबलवर विद्यार्थ्यांनी मांसाहारी जेवण करुन एका प्रकारे प्रतीकात्मक आंदोलनच केले. याआधी विद्यार्थी हे समजूतदारपणे एकाच टेबलवर कॅन्टीमध्ये जेवण करायचे. पण या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते.
मुंबई आयआयटीच्या हॉस्टेल नंबर 12, 13 आणि 14 या हॉस्टेलच्या कॅन्टीला हा मेल पाठवला आहे. जे विद्यार्थी फक्त शाकाहार करतात त्यांच्यासाठी हे टेबल राखीव ठेवावेत. इतर टेबलवर शाकाहार आणि मांसाहार अशा दोन्ही प्रकारचं जेवण विद्यार्थ्यांना जेवता येईल, असं प्रशासनानं या मेलमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत. तर यावर मुंबई आयआयटीचं प्रशासन कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा :
ED : कोविड घोटाळा प्रकरण, डॉ. किशोर बिसुरेंना 20 लाखासह मौल्यवान वस्तू मिळाल्याचा ईडीचा दावा