मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीत शुक्रवारी एक ऐतिहासिक घटना घडली. एरव्ही दिवे लागायच्या आत बंद होणारं मुंबई उच्च न्यायालय शनिवारी पहाटे सूर्योदयाच्या अवघे काही तास आधी बंद झालं.
न्यायमूर्ती शारुख काथावाला यांचं 20 नंबरचं न्यायालय पहाटे तीन वाजेनंतरही सुरू होतं. मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली असून सुमारे साडे सतरा तासांत न्यायमूर्ती शारुख काथावालांनी 121 खटल्यांवर सुनावणी घेतली.
शुक्रवार हा मुंबई उच्च न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजाचा शेवटचा दिवस होता. कारण, शनिवारपासून उन्हाळी सुट्टीनिमित्त मुंबई हायकोर्ट बंद राहणार होतं. शेवटच्या दिवशी न्यायमूर्ती शारुख काथावाला यांनी कोर्ट रुम नंबर 20 मध्ये सकाळी दहा वाजता विविध खटल्यांवर सुनावणी घेण्यास सुरुवात केली.
पाहता पाहता रात्रीचे बारा वाजून गेले तरीही दिव्यांच्या प्रकाशात कोर्टरुममध्ये विविध प्रकरणांवर सुनावणी सुरुच होती. न्यायालयातले ज्येष्ठ वकील पहाटे एक वाजेनंतरही आपल्या अशिलांची बाजू मांडत होते. न्यायमूर्ती काथावालाही वकिलांची बाजू ऐकून एकामागोमाग एक दावे निकाली काढत होते.
अशा प्रकारे रात्री उशिरापर्यंत काम करण्याची काथावालांची ही काही पहिलीच वेळ नाही. सकाळी 11 ते सायंकाळी पाच ही हायकोर्टाच्या नियमित कमकाजाची वेळ असतानाही बऱ्याचदा कोर्टरुम नंबर 20 चं कमकाज हे सकाळी नऊ किंवा त्याआधीही सुरू झालं आहे.
न्यायमूर्ती शारुख काथावाला यांनी दोन आठवड्यांपूर्वी 25 एप्रिलच्या रात्री साडेबारा वाजेपर्यंत विविध प्रकरणांवर सुनावणी घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या चेंबरमध्येही अनेक दावे निकाली काढले होते.