Anil Deshmukh in ED custody : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का बसला आहे. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याआधी शनिवारी अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली होती. मात्र, ईडीने त्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर हायकोर्टाने देशमुख यांना ईडी कोठडी सुनावली आहे. 


शनिवारी ईडी कोठडी संपल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुनावणीसाठी कोर्टात हजेरी लावली होती. ईडीकडून देशमुख्यांच्या 9 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण ती न्यायालयाने नाकारली आणि देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अनिल देशमुख यांची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. 


विशेष पीएमएलए कोर्टाने ईडीची कोठडी देण्याची मागणी फेटाळत देशमुख यांना न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने पीएमएलए कोर्टाचा निर्णय रद्द करत अनिल देशमुख यांना ईडी कोठडी सुनावली. देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी असणार आहेत. 






मुंबईतील बार आणि रेस्टॉरन्ट्सकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यात यावेत असा आदेश अनिल देशमुखांनी दिला होता आणि याची जबाबदारी त्यांनी सचिन वाझे यांच्यावर सोपवली होती अशी तक्रार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केली होती. त्याची दखल घेऊन सीबीआय आणि ईडीने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. ईडीने पाच वेळा समन्स बजावूनदेखील अनिल देशमुख आले नव्हते. अनिल देशमुख यांच्याकडून कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येत होते. त्या दरम्यान ते अज्ञातवासात होते. अखेर चार दिवसांपूर्वी अनिल देशमुख मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर 13 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली होती.