Sameer Wankhede : समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) दिलासा दिला आहे. कॉर्डिलिया क्रुझ प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात 1 मार्चपर्यंत कारवाईपासून संरक्षण देत समीर वानखेडेंना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. तसेच, ईडीनं हा तपास दिल्लीकडे वर्ग केला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी समीर वानखेडेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 


समीर वानखेडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती नाईक आणि न्यायमूर्ती बोरकर यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी पार पडली. सीबीआयनं याप्रकरणी दाखल केलेल्या FIR च्या आधारावर ईडीनं  ECIR नोंदवला. सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यातही समीर वानखेडेंना हायकोर्टानं तूर्तास अटकेपासून दिलासा दिला आहे. तसेच, दोन्ही प्रकरणांवर पुढील सुनावणी 1 मार्चला होणार आहे.      


मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समीर वानखेंडेंची चौकशी 


अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. तसेच, याप्रकरणी मोठी लाच घेतल्याचा आरोप समीर वानखेडेंवर करण्यात आले आहेत. या प्रकरणात ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती. 


ड्रग्स प्रकरण नेमकं काय? 


कॉर्डिलिया क्रुझ ड्रग प्रकरणात बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर आणि मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर एनसीबीकडून छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. यावेळी एनसीबीनं या क्रूझवरुन आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.


एनसीबीनकडून याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी आर्यन खानची निर्दोष सुटका झाली. दरम्यान, समीर वानखेडे यांच्या तपास प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. भ्रष्टाचारासह त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्या प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल करत त्यांची चौकशी सुरू केली होती. 


याप्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्सप्रकरणात अनेक दिवस तुरुंगात होता. मात्र, मे 2022 मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली. त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली.