मुंबई : शाळकरी विद्यार्थ्याला अपशब्द आणि अर्वाच्च भाषा वापरून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. कोल्हापुरातील एका आंतरराष्ट्रीय शाळेतील अध्यक्षांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावताना, विद्यार्थ्यांना फटकारताना शिक्षकांनी त्यांच्या नाजूक मनाचाही गंभीरतेनं विचार करावा, असं निरीक्षण न्यायमूर्ती विनय जोशी नोंदवलं आहे.


काय आहे घटना?


कोल्हापुरातील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये 1 एप्रिल 2022 रोजी दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांकडून फुटबॉल खेळताना एका मुलीला फूटबॉल लागला. त्यावर संताप व्यक्त करत शाळेचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी त्या विद्यार्थ्याला फार कठोर शब्दांत सुनावलं. "तू नालायक आहेस, तू कधीच सुधारणार नाहीस, झोपडपट्टीछाप आहेस, तुझ्यासारख्या प्रवृत्तीच्या मुलांना जगण्याचा अधिकार नाही. जगावर तुम्ही भार आहात. या जगात राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही," अशा अपमानकारक भाषेचा त्यांनी वापर केला. तसेच इथंवर न थांबता अध्यक्षांनी मुलाच्या आजोबांना फोन करून शाळेत बोलावून घेतले, आणि त्यांच्यासमोर पुन्हा त्या मुलाला खडे बोल सुनावले. इतकंच काय तर "तुमच्या नातवाला घेऊन जा आणि शाळेतून काढून टाका' असा खोचक सल्लाही आजोबांना दिला. त्या अपमानानंतर त्या मुलाने घरी जाताच अवघ्या काही तासांत आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं. 


त्यानंतर मुलाच्या घरच्यांनी शाळेतील अध्यक्षांविरोधात शिरोळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोल्हापूर पोलिसांनी त्यानुसार अध्यक्षांवर आयपीसी आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यानुसार कलम 305 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 504 (हेतूपूर्वक अपमान), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 34 (सामान्य हेतू) अन्वये गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे शाळेतील अध्यक्षांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. 


हायकोर्टाचा निकाल काय?


प्रत्येक प्रकरण हे त्यामागील वस्तुस्थिती आणि परिस्थितीवर अवलंबून असतं. एखाद्या व्यक्तीनं दुस-याला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे की नाही, हे केवळ त्या प्रकरणातील तथ्यांवरून समजतं. कारण, आत्महत्येमागे अप्रत्यक्ष कृतीही असू शकते. या प्रकरणात असं दिसून येतंय की, याचिकाकर्त्यांच्या (शाळेचे अध्यक्ष) विरोधात विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही पालकांकडून आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांचं म्हणणे आक्षेपार्ह आहे, असं निरीक्षण नोंदवता येईल. तसेच याचिकाकर्त्याने मुलाच्या आजोबांच्या उपस्थितीतही अर्वाच्च शब्दांत त्याला खडसावलं होतं. त्यामुळे प्रथमदर्शनी असे दिसून येते की, त्या खडसावण्यामुळेच विद्यार्थ्याच्या मनावर खोल निराशेची छाप पाडली. या घटनेनंतरच काही तासांत मुलानं टोकाचे पाऊल उचलून आपलं जीवन संपवलेलं आहे. 


शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या चुकांवरून फटकारू शकतात परंतु, त्यानं मुलांच्या नाजूक मनाला धक्का लागेल किंवा त्यांचे कोवळे मन विचलित होणार नाही, याचंही भान गुरूजनांनी राखायला हवं असही न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं आहे. याचिकाकर्त्यांच्या या कृत्यामुळे एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला, हे विसरूनही चालणार नाही. तसेच या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. त्याबाबतच्या चौकशीसाठी आरोपीची कोठडीत आवश्यक असल्याचं नमूद करत हायकोर्टानं गणपतराव पाटील यांना अटकेपासून कोणतंही संरक्षण देण्यास नकार देत त्यांची अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावली.