मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मालमत्ता असलेल्या भेंडीबाजारमधील मुसाफिरखानाच्या पाच मजली इमारतीच्या विक्रीला विरोध करणारी गाळेधारकांची याचिका गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. त्यामुळे या इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.


दक्षिण मुंबईमधील भेंडीबजार परिसरात पाकमोडिया स्ट्रीटवर असलेल्या मुसाफिरखानाच्या इमारतीची विक्री नियमांचा भंग करुन झाल्याचा दावा करत इमारतीमधील गाळेधारकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना ट्रस्टच्यावतीनं गाळेधारकांनी ही याचिका दाखल केली होती. संबंधित मालमत्ता ही वक्‍फ बोर्डाची आहे आणि वक्‍फ मंडळाची मालमत्ता अशी विकता येणार नाही, असा दावा याचिकादारांनी हायकोर्टात केला होता. मात्र, संबंधित मालमत्ता सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने खरेदी केली आहे. महापालिकेच्या क्‍लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्‍टनुसार ही मालमत्ता या ट्रस्टचीच आहे. त्यामुळे हायकोर्टानं याचिकादारांचा हा दावा नाकारला असून संबंधित मालमत्ता ही वक्‍फ बोर्डची नसल्याचे स्पष्ट केले आहे.

धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निकालानुसार इमारतीचे दुरुस्तीकाम अत्यावश्‍यक आहे. त्यामुळे आता या इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा झाला आहे. या इमारतीमध्ये एक प्रार्थना स्थळ आणि सुमारे दुकानं-निवासस्थानं मिळून 32 गाळे आहेत. याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचीही मालमत्ता आहे. सध्या या मालमत्तेचा ताबा मुंबई पोलिसांकडे असून न्यायालयामध्ये याबाबत प्रकरणही सुरू आहे. दाऊदच्या मुंबई शहर-उपनगरांमध्ये ज्या काही मालमत्ता आहेत त्यापैकी ही एक अत्यंत महत्वाची मालमत्ता समजली जाते.