मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या खासदारकीला आव्हान दिल्यानंतर, आता मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) समन्स बजावलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे यांच्या निवडीला आव्हान देत, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri Sindhudurg) नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत झाली होती. त्यात नारायण राणे यांनी विजय मिळवला होता. मात्र नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप करत विनायक राऊत यांनी त्यांच्या निवडीला विरोध केला होता.
विनायक राऊत यांची याचिका नेमकी काय?
विनायक राऊत हे 2014 आणि 2019 असे दोन टर्म खासदार होते. शिवसेनेच्या तिकीटावर ते संसदेत गेले. शिवसेनेच्या फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीत विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात लढत झाले. नारायण राणे हे भाजपच्या तिकीटावर तर विनायक राऊत हे शिवसेना ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढले. यावेळी नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा 47858 मतांनी पराभव केला. मात्र नारायण राणे यांनी मतदारांना धमकी देऊन, बळजबरी करुन मतदान करुन घेतल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला. केवळ आरोप न करता विनायक राऊत यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.
त्यामुळे नारायण राणे यांचा विजय रद्द करुन निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या,अशी मागणी विनायक राऊत यांनी केली.
धमकी दिल्याचा आरोप
लोकसभा निवडणुकीचा प्रचार 5 मे 2024 रोजी संपलेला होता, मात्र भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करत होते, असा आरोप विनायक राऊत यांनी याचिकेद्वारे केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे वाटले, त्याचे व्हिडीओ सर्वत्र प्रसारित आहेत. दुसरीकडे नारायण राणेंचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन धमकावले. जर तुम्ही नारायण राणे यांना मतदान केलं नाही, त्यांना लीड दिलं नाही तर आमच्याकडे निधी मागायला यायचं नाही, असं नितेश राणे यांनी मतदारांना धमकावलं, असं विनायक राऊत यांनी म्हटलं. तसा उल्लेख विनायक राऊत यांनी याचिकेत केला.
संबंधित बातम्या