मुंबई : आपल्या जन्मदात्या आईची राहत्या घरी निर्दयीपणे हत्या केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या सिद्धांत गणोरे या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला अखेर मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. आपली मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याने आपण आपल्या बचावासाठी युक्तीवाद करण्यास असमर्थ आहोत. त्याचा सारासार विचार करुन न्यायालयाने आपल्याला जामीन मंजूर करावा अशी मागणी गणोरे याने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती.
न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी बुधवारी त्याची 25 हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र सिद्धांतला दर तीन महिन्यांतून एकदा पोलीस स्टेशनला हजेरी आणि कोर्टातील या खटल्याला उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे.
प्रभात कॉलनी सांताक्रुझ पूर्व येथे राहणाऱ्या 21 वर्षीय सिद्धांतने त्याची आई दिपाली हिची 23 मे 2017 साली चाकूने भोसकून हत्या केली होती. हे भीषण कृत्य केल्यानंतर त्याने आईच्या मृतदेहाशेजारी तिच्याच रक्ताने संदेश लिहून स्माईलीही काढली होती. याप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या सिद्धांतचे वडील ज्ञानेश्वर गणोरे हे पोलीस अधिकारी असून सिद्धांतच्या सुटकेसाठी त्यांनी फेब्रुवारी महिन्यात सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
या अर्जात त्यांनी त्याचे मानसिक संतुलन ढासळल्याचा दावा केला होता. परंतु सिद्धांतला कोणताही मानसिक आजार झालेला नाही, असा अहवाल जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोर्टात सादर केल्याने सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे सिद्धांतला जामीन मिळावा म्हणून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
मानसिक स्थिती व्यवस्थित नसलेले आरोपी आपली बाजू मांडण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे अशा आरोपींची सुटका करण्याबाबत कलम 330 मध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्याआधारावर आपली सुटका करण्यात यावी अशी विनंती सिद्धांतने हायकोर्टासमोर केली होती.
आईची हत्या करणाऱ्या मुलाला अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
03 Apr 2019 11:52 PM (IST)
सिद्धांतला कोणताही मानसिक आजार झालेला नाही, असा अहवाल जे जे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोर्टात सादर केल्याने सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे सिद्धांतला जामीन मिळावा म्हणून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -