मुंबई : पत्नीला चविष्ट स्वयंपाक करत नाही, हे घटस्फोटाचं कारण होऊ शकत नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने एका पतीची याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.


पत्नीला स्वयंपाक येत नाही, ती उशिरा उठते, ती कर्तव्यदक्ष नसल्याचं कारण सांगत तिच्यापासून घटस्फोट मिळावा, अशी याचिका सांताक्रूझ इथे राहण्याऱ्या एका व्यक्तीने दाखल केली होती. परंतु हे घटस्फोटासाठीचं कारण असू शकत नाही, असं सांगत उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली.

पत्नीला लवकर उठवायला गेल्यावर, ती मला आणि माझ्या पालकांना शिवीगाळ करते. ती पुरेसा आणि चविष्ट स्वयंपाक करत नाही. एक दिवस कामावरुन घरी उशिरा परतल्यावर तिने साधं पाणीही विचारलं नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांने केला. मात्र, पत्नीने सर्व आरोप फेटाळले. कामाला जाण्यापूर्वी मी सर्व कुटुंबीयांसाठी स्वयंपाक करुन जात होतं, असं पत्नीने न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, स्वयंपाक न येणं ही क्रूरता नाही, त्यामुळे घटस्फोट होऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. तसंच संबंधित महिला नोकरदार आहे. ती काम करुन अतिरिक्त भार सहन करत आहे. त्यामुळे नोकरी सांभाळून ती इतर कामं करते, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असंही कोर्टाने आवर्जून नमूद केलं.