मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला वैद्यकीय कारणांसाठी जामीन मंजूर करण्यास हायकोर्टानं पुन्हा एकदा नकार दिला आहे. मात्र प्रकृती अस्वस्थ्याचं कारण लक्षात घेत पीटरला त्याच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात 15 दिवसांसाठी दाखल करण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे. तसेच 12 जुलैपर्यंत पीटरच्या प्रकृतीचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश जेल प्रशासनाला देण्यात आले आहेत. सोमवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर पीटरच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणीतही सीबीआयनं पीटरच्या जामीन अर्जाला विरोध केला.

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या पीटर मुखर्जीचा हा सहावा जामीन अर्ज आहे. विशेष सीबीआय कोर्टानं वैद्यकिय कारणांसाठी केलेला जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं पीटरनं याच कारणासाठी आता हायकोर्टात अर्ज केला आहे. त्याचबरोबर तपासयंत्रणेकडे आपल्याविरोधात सबळ पुरावे नाहीत असा पीटरचा दावा अजूनही कायम आहे.

पीटर मुखर्जीला 16 मार्चला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर कोर्टाच्या संमतीने त्याला शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेव्हापासून पीटर मुखर्जीची प्रकृती काहीशी नाजूकच आहे.

काय आहे प्रकरण?

शीना बोराची हत्या 2012 मध्ये करण्यात आली. तिची आई इंद्राणी मुखर्जीनं, तिचा आधीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्या मदतीने शीनाची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाटही लावली.

शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जीची बहिण नसून मुलगी आहे हे सत्य पीटरला ठाऊक होते. तसेच पीटरला पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा राहुल आणि शीनाचे प्रेमसंबंध जुळले आहेत ही बाबही त्याला ठाऊक होती. अशी माहिती सीबीआयनं कोर्टाला दिली आहे. तसेच शीना बोराचा शोध घेण्यासाठी पीटरने कोणतीही पावलं उचलली नाहीत असाही सीबीआयचा दावा आहे.