मुंबई : बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि डीजे अकील यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. संदेसरा बँक कर्ज प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने दिनो आणि अकील यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. जवळपास साडेचौदा हजार कोटींची व्याप्ती असलेल्या घोटाळ्यात दोघांचं नाव समोर आलं आहे.

स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड, संदेसरा ग्रुप आणि नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दीप्ती चेतन संदेसरा यांनी बँकांना 14 हजार 500 कोटींचा चुना लावल्याचा आरोप आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. दिनो आणि डीजे अकीलसोबत या कंपनीचे काही व्यवहार झाल्यामुळे त्यांना समन्स जारी करण्यात आलं आहे.

स्टर्लिंग बॉयोटेकचे मालक असलेले संदेसरा बंधू चेतन जयंतीलाल संदेसरा आणि नितीन जयंतीलाल संदेसरा यांच्यावर खोट्या कंपन्या दाखवून बँकांकडून कर्ज लाटल्याचा आरोप आहे. संदेसरा बंधूंविरोधात सीबीआयने पाच हजार 700 कोटी रुपयांच्या फसवणुकीची केस दाखल केली होती. फरार आरोपींविरोधात ईडीने लूकआऊट नोटीसही जारी केली आहे.

Amitabh Helps Farmers | अमिताभ बच्चन यांच्याकडून बिहारमधील 2100 शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं



या घोटाळ्याची व्याप्ती पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यापेक्षाही मोठी असल्याचा दावा ईडीने केला आहे. नीरव मोदी-मेहुल चोक्सीने 11 हजार 400 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

दिनो मोरियाने 1999 साली 'प्यार में कभी कभी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र बिपाशा बसूसोबत त्याची भूमिका असलेल्या 'राज' सिनेमामुळे 2002 साली तो नावारुपास आला. त्यानंतर फारसे चित्रपट हिट न झाल्यामुळे तो बॉलिवूडपासून दूरच राहिला. अलोन (2015) चित्रपटात तो पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता.