मुंबई : आज मुंबईतील ना. म. जोशी मार्ग इथल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी 300 घरांची लॉटरी काढली गेली. बीडीडी चाळ सोडून गेलेल्या आणि संक्रमण शिबिरात रहाणाऱ्या रहिवाशांसाठी म्हाडाने ही लॉटरी काढली. मात्र, बीडीडी चाळ विकसित करण्याची कुठलीही हालचाल नसताना लॉटरीचे नाटक कशाकरता असा प्रश्न बीडीडी चाळीतील इतर रहिवाशांनी उपस्थित केला आहे.


एकीकडे या रहिवाशांसाठी घरांची लॉटरी काढण्याचा कार्यक्रम वांद्रे इथे म्हाडाच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीनं होत असताना त्याचवेळी या कार्यक्रमाच्या विरोधात ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी मैदानावर बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आंदोलन केलं.


बीडीडी चाळीतल्या 10 बाय 10 च्या खोलीत आयुष्य काढलेल्यांना आता स्वत:च्या मालकीचं ऐसपैस घर मिळणार ही नुसतीच स्वप्नंही सुखावून गेली. बीडीडी चाळीतल्या या लहानश्या खोल्यांनी 4 पिढ्यांचे संसार पाहिलेत आणि आता पाचव्या पिढीला स्वत:चा ब्लॉक मिळणार अशी योजनाही आणली गेली. आज याच स्वप्नाची किल्ली बीडीडी चाळ रहिवाशांच्या हाती आली. पण, ही किल्ली किती खरी आणि किती खोटी हा प्रश्न या रहिवाशांना पडलाय.


बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा आराखडा निश्चित नाही, कोणतं घर कुठे मिळणार याबाबत नियोजन नाही. तरीही लॉटरी कशी काय काढली जातेय. केवळ संक्ररमण शिबिरात स्थलांतरीत झालेल्या 272 रहिवाशांची लॉटरी काढून घर कधी ताब्यात येईल याचं उत्तर मिळणार का असे अनेक प्रश्न विचारले जातायेत. त्यासाठीच आज ना. म. जोशी मार्गावर रहिवाशांनी या लॉटरीचा निषेध करणारं आंदोलन केलं.


आदित्य ठाकरे इथले स्थानिक आमदार आहेत. बीडीडी प्रश्नावर अनेकदा भेटीची वेळ मागूनही ते वेळ देत नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे. एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे मात्र लॉटरी अश्या स्थितीत स्थानिक रहिवाशांना इतके वर्षे पाहीलेलं स्वप्नं खरोखर पूर्ण होईल की नाही याबाबतच साशंकता वाटायला लागलीय.